होमपेज › Jalna › आजुबाई यात्रा तोंडावर, नियोजन नाही

आजुबाई यात्रा तोंडावर, नियोजन नाही

Published On: Mar 08 2018 12:39AM | Last Updated: Mar 08 2018 12:33AMआन्वा : प्रतिनिधी 

भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील आजुबाई देवीची स्वारी यात्रा 17 मार्चपासून चैत्र सुरू होत आहे. देवीची  यात्रा अवघ्या वीस दिवसांवर आलेली असतानाही  ग्रामपंचायतकडून  यात्रेसाठीची कोणतीही पूर्वतयारी करण्यात न आल्याने यात्रेनिमित्त येणार्‍या भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.

गाव परिसरात रस्त्यावर खड्डे पडले असून पंधरा दिवसांपासून संबंधित गुत्तेदारांनी रस्ता उखडून टाकला आहे. त्यामुळे भाविकांसह वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आजुबाईदेवी स्वारी यात्रेला दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. मात्र या वर्षी यात्रेसाठी ग्रामपंचायत प्रशासनाची कोणतीही पुर्वतयारी नसल्याने  भाविकांना चांगले रस्ते, सभागृहाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे यात्रेचे नियोजन कोलमडणार असे दिसत आहे. 

स्वारी यात्रेच्या महिनाभर अगोदरच बैठक घेऊन नियोजन केले जाते. मात्र  यावर्षी अद्याप एकही बैठक झाली नाही. ग्रामपंचायत व तहसील प्रशासनाचे यात्रेकडे लक्षच नसल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. आजुबाई देवीची स्वारी यात्रा राज्यभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या यात्रेचा तालुका प्रशासनासह सर्वच विभागावर ताण पडतो. त्यातच यात्रेसाठी दाखल होणार्‍या भाविकांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत चालली आहे. 

मागील काही वर्षात यात्रेच्या नियोजनासंदर्भात महिनाभर अगोदरपासूनच बैठका घेऊन वेगवेगळ्या विभागांना जबाबदार्‍या देऊन त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले जात होते.परंतु, सध्या यात्रेतील महत्वाचा घटक असलेले उपविभागीय अधिकारी, तहसीलदार अद्याप कोणतीच हालचाल दिसून येत नाही.

यावर्षी 17 मार्चपासून देवी चैत्र शुद्ध नवरात्र याञा उत्सव सुरू होत आहे. चैत्र आष्टमीच्या 25 मार्च रोजी मध्यरात्री देवीची स्वारी निघते. त्यादृष्टीने तयारीसाठी तातडीने प्रशासनाने हालचाल करण्याची गरज स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे.