होमपेज › Jalna › सावकारांनी वाटले सव्वादहा कोटींचे कर्ज 

सावकारांनी वाटले सव्वादहा कोटींचे कर्ज 

Published On: Apr 28 2018 1:42AM | Last Updated: Apr 27 2018 11:53PMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यात बँकेचे जाळे सर्वदूर पसरलेेले असतानाही सावकारांकडून कर्ज घेण्याकडे नागरिकांचा ओढा दिसून येतो. 2017-18 या आर्थिक वर्षात सावकारांनी 13 हजार 9 कर्जदारांना 10 कोटी 20 लाख 26 हजारांचे कर्ज वाटप केले आहे. 

जिल्ह्यात बँक, पतसंस्थांसह विविध कार्यकारी सोसायटी, बचत गटांचे जाळे शहरी व ग्रामीण भागात दूरवर पसरलेले आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले जाते. असे असले तरी आजही  जिल्ह्यात परवानाधारक सावकारांनी मागील आर्थिक वर्षात 7 शेतकर्‍यांना 1 कोटी 30 लाखांचे तर बिगर कृषी क्षेत्रासाठी 13 हजार 2 कर्जदारांना 10 कोटी 19 लाख 56 हजारांचे कर्ज वाटप केले आहे.

त्यात जालना तालुक्यात सर्वात जास्त 11 हजार 877 कर्जदारांनी 8 कोटी 84 लाख 87 हजार, बदनापूर 83 कर्जदारांना 9 लाख 56 हजार, अंबड 40 कर्जदारांना 8 लाख 57 हजार, घनसावंगी 506 कर्जदारांना 43 लाख 12 हजार, परतूर 413 कर्जदारांना 64 लाख 22 हजार, मंठा 34 कर्जदारांना 5 लाख 15 हजार, जाफराबाद 49 कर्जदारांना 4 लाख 7 हजार तर भोकरदनमध्ये सावकाराने एकही कर्ज दिल्याचे वृत्त नाही. शासनाने केलेल्या कडक कायद्यामुळे पूर्वीप्रमाणे कर्ज वसूल करताना सावकारास मनमानी करता येत नाही. कर्जदारही आता सजग व कायद्याचे ज्ञान असणारे  झाल्याने कर्ज वसुली करताना अडचणी येत आहेत. बँका व पतसंस्थांच्या जमान्यात आजही सावकारी तग धरून आहे. 

कर्ज वाटपाच्या तक्रारी आल्यास जिल्हा उपनिबंधकाद्वारे सावकारावर कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहूनच परवानाधारक सावकारांना आता धंदा करावा लागत आहे. बँका व पतसंस्थेत कर्ज घेताना विविध कागदपत्रे द्यावी लागत असतानाच सावकाराकडे तुलनेने कमी पैशात व रात्री- अपरात्री पैसे मिळत असल्याने ग्रामीण भागात आजही सावकारालाच कर्जदार पंसती देताना दिसत आहे.