होमपेज › Jalna › खोत यांनी केली गारपीटग्रस्त भागाची पाहणी

खोत यांनी केली गारपीटग्रस्त भागाची पाहणी

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 21 2018 1:21AMजालना : प्रतिनिधी

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी गारपीटग्रस्त भागांची पाहणी केली, मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध, बिघडलेली प्रकृती व त्यानंतर त्यांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना सोबत घेऊन केलेला दौरा या  कारणामुळे चांगलाच चर्चेत राहिला. 

कृषी राज्यमंत्री खोत मंगळवारी जिल्हा दौर्‍यावर आले होते. सकाळी त्यांनी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानाला भेट दिली. त्यानंतर ते राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडे नाश्ता करण्यासाठी गेले. वंजर उम्रद व थार येथे गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतीमालाची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री खोत निघाले. मात्र अंबड चौफुलीजवळच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने ते सर्वे क्रमांक 488 विश्रामगृहात माघारी आले. दरम्यान तिकडे खोत यांच्या दौर्‍याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जोरदार तयारी केली होती. सकाळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंदेगाव फाट्यावर काळे झेंडे दाखवून खोत यांच्या दौर्‍याचा निषेध केला.

राज्यमंत्री खोत हे थार व वंजार उम्रद येथे भेट देणार असल्याने स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गोंदेगाव फाट्याजवळ त्यांच्या निषेधासाठी गर्दी केली. मात्र   खोत यांनी खोतकरांना बरोबर घेत राजूरमार्गे पिंपळगावकडे जात  आंदोलनकर्त्यांना चकमा दिला व  गारपिटग्रस्त गावांचा दौरा केला. यावेळी त्यांनी धावेडी व थार येथे द्राक्ष बागेस झालेल्या नुकसानाच्या पाहणीसह वंजार उम्रद येथे गारपिटीने मृत पावलेल्या नामदेव शिंदे यांच्या कुटंबीयांची भेट घेतली. त्यांनतर खोेत यांनी मातोश्री लॉन्स येथील शिवसेनेचे नेते लक्ष्मण वडले यांच्या चिरंजीवाच्या व पुतण्याच्या विवाहसोहळ्यास हजेरी लावली. मंठा रोड, चौधरी नगर येथील क्रांती संघटनेच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटनही राज्यमंत्री खोत यांच्या हस्ते करण्यात आले. 

स गारपीट झाल्यानंतर तब्बल दहा दिवसानंतर राज्यमंत्री नुकसानीची पाहणी करण्यासाठी उशिराने आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा त्यांच्या दौर्‍याला विरोध होता. विवाह सोहळ्यानिमित्ताने जालन्यात येउन गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यास खोत गेल्याची चर्चा होत आहे. या सर्व वादविवादामुळे खोत यांचा दौरा चर्चेत राहिला. 

गारपिटीमुळे जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या शेतीमालाचे मोठे नुकसान झाले. या गारपिटीत दोन शेतकर्‍यांना जीव गमवावा लागला. राज्यमंत्री खोत यांनी घटना घडल्यानंतर तातडीने येणे गरजेचे होते. मात्र ते तब्बल दहा दिवस उशिराने आले. यातून शेतकर्‍यांप्रती त्यांच्या भावना व्यक्त होतात.
- साईनाथ चिन्नदोरे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना