Wed, Jul 24, 2019 12:39होमपेज › Jalna › दूध उत्पादकांची कोंडी, उत्पादनात होणार घट...!

दूध उत्पादकांची कोंडी, उत्पादनात होणार घट...!

Published On: Apr 24 2018 1:39AM | Last Updated: Apr 24 2018 1:21AMभोकरदन : प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय बाजारात पावडर आणि बटरचे दर कमी झाल्याचे कारण देत राज्यातील बहुतांश सहकारी व खासगी दूध संस्था, उत्पादकांना सध्या 20 रुपयांच्या आतच दर देण्याचे धोरण आखले आहे. हा दर गुणवत्ता मानकांपेक्षाही कमी मिळत असल्याने उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. संपूर्ण तालुक्यात मिळून दिवसाकाठी तीन ते चार हजार लिटर दुधाचे संकलन होते. वाढत्या तापमानामुळे यात घट होत आहे. मात्र भाव कमी मिळत असल्याने उत्पादकांतून तीव्र नाराजी आहे. 

नुकत्याच झालेल्या शेतकरी आंदोलनानंतर शासनाने दूध खरेदीदरात तीन रुपयांनी वाढ केली होती. प्रत्यक्षात त्यापूर्वीच काही सहकारी संस्थांनी गायीच्या दुधाचा खरेदी दर 27 तर म्हशीच्या दुधाला 35 रुपये भाव दिला होता. मात्र हळूहळू तो कमी करीत 20 रुपयांपर्यंत खाली आला.

 मागील वर्षीची परिस्थिती वेगळी नव्हती. मात्र अनेक दूध संस्था या राजकीय नेत्यांच्या असल्याने व निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शेतकर्‍यांना दुखवणे परवडणारे नव्हते. त्यामुळेच 25 ते 27 रुपयांपर्यंत दर मिळत होता. आज हे दर  20 रुपयांच्या पातळीवर घसरलेत. याचा अर्थ खासगी किंवा सहकारी दूध संघांवर नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी ठरत आहे. 

कडक उन्हामुळे जनावरांसाठी हिरव्या सकस चार्‍याची टंचाई सुरू आहे. हा सकस चारा न मिळाल्याने व वाढत्या उष्णतेमुळे संकरित जनावरांचे दूध उत्पादन घटते. घटलेले दूध उत्पादन, मिळणारा कमी दर व वाढणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने दुग्धउत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.