होमपेज › Jalna › वडीगोद्रीतून बिबट्याचा चुर्मापुरी परिसरात मोर्चा 

वडीगोद्रीतून बिबट्याचा चुर्मापुरी परिसरात मोर्चा 

Published On: Jun 04 2018 1:03AM | Last Updated: Jun 03 2018 11:41PMवडीगोद्री : प्रतिनिधी

पंधरा दिवसांपासून वडीगोद्री परिसरात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. शनिवार, 2 जून रोजी बिबट्याने मोर्चा चुर्मापुरी परिसरात वळवला असल्याने तेथे दहशतीचे वातावरण आहे. 

अंंबड तालुक्यातील चुर्मापुरी शिवारातील गट नंबर 31 मध्ये शनिवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास  लक्ष्मण जाधव हे  मुलगा  व  जोशी नावाच्या शेतकर्‍यासह  जेवण करून शेतामध्ये उसाला पाणी देण्यासाठी मोटारसायकलवरून जात होते. त्यांना अचानक पाणंद रस्त्यावर बिबट्याने दर्शन दिले. घाबरलेल्या जाधव यांनी ही माहिती चुर्मापुरी व नालेवाडी गावातील लोकांना भ्रमणध्वनीवरून कळवली. त्यानंतर पंधरावीस मोटारसायकलवर आलेल्या लोकांनी  बॅटरीच्या साह्याने संपूर्ण परिसर पिंजून काढला. यावेळी त्यांना बिबट्या उसाच्या शेतामध्ये पळाल्याचे लक्षात आले. 

रात्री बिबट्याने चुर्मापुरी शिवारात  दर्शन दिल्याने शेतकरी  डाव्या कालव्यात पाणी असूनसुध्दा भीतीच्या वातावरणामुळे ते देण्यास जाण्यासाठी तयार नाहीत. बिबट्याचे प्रकरण वनविभागाने गंभीर न घेतल्याने वडीगोद्री परिसरातील ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे. 

येत्या काही दिवसांत पेरण्या सुरू होणार असल्याने शेतात जाऊन कामे करावयाची कशी असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे. एखाद्याचा बिबट्याने जीव घेतल्यानंंतर वनविभागाला जाग येणार का, असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत. वडीगोद्री परिसरात बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील शेतकरी हे जमाव करून शेतात जात आहेत.  जनावरे सुरक्षित ठेवण्यासाठी  शेतकर्‍यांनी गोठ्याला  जाळी लावून जनावरे जाळीच्या आत ठेवली आहे.