Tue, Sep 25, 2018 08:37होमपेज › Jalna › जाफराबाद : जोर‘धार’

जाफराबाद : जोर‘धार’

Published On: Jun 24 2018 1:33AM | Last Updated: Jun 23 2018 10:40PMजाफराबाद ः प्रतिनिधी 

शहरासह तालुक्यात सर्वदूर शुक्रवारी सायंकाळपासून शनिवारी दुपारपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे तालुक्यात लागवड सुरू झाली आहे. उशिरा का होईना पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला आहे. 

शुक्रवारी सायंकाळी बोरगाव, शिंदी, आडा, पासोडी, भारज, सवासणी, जवखेडा, आरतखेडा, माहोरा, बेलोरासह तालुक्यातील उत्तर भागात जोरदार पाऊस झाला. धामणा नदीच्या उगम भागात गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे अचानक नदी दुथडी भरून वाहू लागली. त्याचबरोबर शनिवारी सकाळी सर्वदूर आभाळ ढगांनी भरून आले होते. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोराचा पाऊस झाला.

तालुक्यातील टेंभुर्णी, देळेगव्हाण, आंबेगाव परिसरात आठवडाभरापूर्वी अवकाळी पावसाने वादळी वार्‍यासह जोरदार हजेरी लावली होती. या परिसरात अगोदरच लागवड झालेली होती. शनिवारी शेतकर्‍यांनी पेरणीला सुरुवात केली. कपाशी, आद्रक, मिरची, मका व  भाजीपाला लागवड होत आहे. हवामान खात्याने वर्तविल्याप्रमाणे पाऊस लवकर येणार असल्याने शेतकर्‍यांनी शेतीच्या मशागतीच्या कामांना लवकरच सुरुवात केली होती. 23 रोजी काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.