Wed, Apr 24, 2019 15:31होमपेज › Jalna › ‘ती’ बोलत नसल्याने ‘त्याने’ केली इन्स्टाग्रामवर बदनामी

‘ती’ बोलत नसल्याने ‘त्याने’ केली इन्स्टाग्रामवर बदनामी

Published On: Aug 24 2018 12:43AM | Last Updated: Aug 23 2018 11:28PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

सीए फाउंडेशन कोर्स करण्यासाठी सोबत असताना ओळख झाल्यावर ‘तो’ तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला. त्यामुळे ‘तिने’ बोलावे, सोबत राहावे, असे त्याला वाटू लागले. पण, ‘ती’ काही बोलत नव्हती. याचा राग मनात धरून त्याने तिची ‘इन्स्टाग्राम’वर बदनामी केली. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यावर सायबर पोलिसांनी उच्चशिक्षित तरुणाला जालन्यातून अटक केली. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली.

मोहित मुरलीमनोहर जाखोटिया (23, रा. रधम सेंटर, आंध प्रदेश, ह.मु. महिको कॉलनी, जालना) असे आरोपीचे नाव असून त्याचे वडील एका कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, शहरातील 22 वर्षीय तरुणी सीए फाउंडेशनचा कोर्स करीत आहे. बीकॉमची डिग्री घेतलेला आरोपी मोहितही याच कोर्ससाठी शहरात आला. सोबत कोर्स करताना त्यांची ओळख झाली. त्यानंतर मोहित तरुणीवर एकतर्फी प्रेम करू लागला. त्यामुळे तरुणीने आपल्याशी बोलावे, असे त्याला सतत वाटू लागले, पण ती मोहितला टाळत होती. तरुणी बोलत नसल्यामुळे मोहितने इन्स्टाग्रामवर तरुणीचे अश्‍लील छायाचित्र टाकले. त्यानंतर तिची वैयक्तिक माहिती तो इन्स्टाग्रामवर टाकू लागला. हा प्रकार तरुणीला समजल्यावर तिला धक्का बसला. तिने गुन्हा दाखल केला.उपनिरीक्षक हेमंत तोडकर यांनी आरोपीविरुद्ध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे गोळा केले. त्यानंतर उपनिरीक्षक तोडकर, हेडकॉन्स्टेबल संजयकुमार साबळे, धुडकू खरे, विवेक औटी, नितीन देशमुख, गोकूळ कुतरवाडे यांनी मोहित जाखोटिया याला अटक केली.