Sun, Nov 18, 2018 00:45होमपेज › Jalna › पावसासाठी हिवरा काबलीमध्ये ‘बेडकाचा विवाह’

पावसासाठी हिवरा काबलीमध्ये ‘बेडकाचा विवाह’

Published On: Aug 11 2018 1:38AM | Last Updated: Aug 11 2018 1:38AMजाफराबाद ः ज्ञानेश्‍वर पाबळे

तालुक्यातील हिवराकाबली परिसरात रुसलेला पाऊस पडण्यासाठी ग्रामस्थांनी बेडकाचा विवाह महादेव मंदिरात लावला. यावेळी वधू-वरांसाठी आंतरपाट,  मुंडावळ्या, मंगलाष्टके व अक्षता आदींची जय्यत तयारी करण्यात आली होती. लग्‍नानंतर वर्‍हाडीच्या जेवणाच्या पंक्‍तीही उठल्या. या आगळ्यावेगळ्या विवाहाची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुुरू आहे

तालुक्यात गेल्या महिनाभरापासून रुसलेला  वरुणराजा पुन्हा बरसावा, यासाठी हिवरा काबली परिसरास ग्रामस्थांनी सामूहिक प्रार्थना, नमाज, महादेवाला जलाभिषेक केले. धोंडी धोंडी पाणी दे, म्हणत महादेवाला साकडेही घातले. मात्र तरीही वरुणराजा बरसत नसल्याने हवालदिल झालेल्या ग्रामस्थांना बेडकाचा विवाह लावल्यास पाऊस पडेल, असे सांगण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी महादेव मंदिरात विवाहाची तयारी सुरू झाली. मांडव उभारण्यात आला, वधू-वरांना मुंडावळ्या बांधण्यात आल्या.

छोटा आंतरपाटही मध्ये धरण्यात आला. वर्‍हाडी मंडळींना अक्षता वाटण्यात आल्या. मंगलाष्टके म्हणण्यात आली. सूर-सनईच्या मंगल सुरात लग्‍नाचा हा मुहूर्त साधण्यात आला. लग्न लागल्यानंतर वर्‍हाडी जेवणात गुंग असतानाच वधू-वर मात्र मंडपातून पसार झाले. बेडकाच्या या विवाहानंतर पाऊस पडणार का? हे प्रश्‍नचिन्ह कायम आहे. वरुणराजाला प्रसन्‍न करण्याचे प्रयत्न गावकरी करीत असले तरी तो प्रसन्‍न होत नसल्याने सर्वांच्या चिंता वाढल्या आहेत.