Fri, Jul 19, 2019 15:40होमपेज › Jalna › आनंदवाडीत अग्नितांडव

आनंदवाडीत अग्नितांडव

Published On: Apr 21 2018 1:00AM | Last Updated: Apr 21 2018 1:00AMपरतूर : प्रतिनिधी

परतूर शहरापासून 3 कि. मी. अंतरावर असणार्‍या आनंदवाडी या गावात शुक्रवारी (दि. 20) दुपारी भापकर बांधवांच्या चार वाड्यांना लागलेल्या भीषण आगीत चारही वाडे जळून भस्मसात झाले. या आगीत संसारोपयोगी वस्तूंसह पैसे, ज्वारी, गहू व इतर धान्यांचे पोते, शेतीउपयोगी औजारे असा एकूण एक कोटीचा मुद्देमाल जळून खाक झाला.

आनंदवाडी येथील भापकर बंधूंचे चार लाकडी वाडे लगत आहेत. त्यातील देविदास भापकर यांच्या वाड्यास दुपारी आग लागली. पाहता पाहता या आगीने उग्र रूप धारण करीत चार वाडे आपल्या कवेत घेतले. आगीच्या या तांडवात वाड्यातील महिला, पुरुष, बालके  व तरुण कसेबसे घराबाहेर पडल्याने जिवीतहानी झाली नाही. वरच्या मजल्यावर शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वर  कोणी नसल्याने आग लागल्याचे लक्षात आले नाही. अवघ्या दहा मिनिटातंच आगीने आजू बाजूच्या खोल्यांना वेढले. बाजूला बाबुराव तात्याराव भापकर, रामदास केशवराव भापकर, भुजंग विश्‍वनाथ भापकर यांचेही घरे आगीच्या चपाट्यात सापडले. चारही घरातील कुटुंबीयांचे केवळ अंगावर असलेले कपडेच शिल्‍लक राहिले. आगीत तीन हजार क्‍विंटल धान्य भस्मसात झाले. भापकर यांच्या वाड्यातील चारही घरात सोयाबीन, हरबरा, गहू, ज्वारी, शिवाय शेवटच्या वेचणीचा कापूस व इतर धान्य असे जवळपास अडीच हजार ते तीन हजार क्‍विंटल धान्य होते. चारही घरे ही जुनी सागवान लाकडाची असल्याने आगीने अवघ्या काही मिनिटांतच तांडव केले.

या आगीत नगदी रुपये, सोने-चांदीचे दागिने, कपडे आदी सर्व मौल्यवान साहित्य भस्मसात झाले. आगीमुळे झालेले नुकसान पाहून परिवारातील सदस्यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आग आटोक्यात आणण्यासाठी परतूर व अंबड येथील अग्‍निशामक दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आल्या होत्या. तसेच ग्रामस्थांनी वेळीच मिळेल त्या साहित्याने पाणी टाकून व माती टाकून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. चार ते पाच तासांनंतर आग आटोक्यात आली. तरीही धुराचे लोट सुरूच होते. घटनास्थळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, अन्वर देशमुख, नितीन जेथलिया, भाजपचे तालुकाध्यक्ष रमेश भापकर, सेनेचे माधवमामा कदम आदींनी भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली, तर प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार फुफाटे यांनी भेट दिली. सदर घटनेचा पंचनामा मंडळ निरीक्षक कुलकर्णी व डोल्हारकर व त्यांचे सहकारी तलाठी हे उद्या सकाळी आग पूर्ण शांत झाल्यानंतरच करणार असल्याचे तहसीलदार बी. बी. फुफाटे यांनी सांगितले.