Thu, Jul 18, 2019 00:37होमपेज › Jalna › शेतकर्‍यांचे फेरफार नक्कलसाठी आंदोलन

शेतकर्‍यांचे फेरफार नक्कलसाठी आंदोलन

Published On: Jun 06 2018 1:42AM | Last Updated: Jun 05 2018 10:59PMभोकरदन : प्रतिनिधी

तालुक्यातील अनेक गावांतील सुमारे शंभर ते दीडशे शेतकर्‍यांनी मंगळवारी दुपारी तहसीलच्या फेरफार नोंदीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करून रोष व्यक्त केला. फेरफार नकला वेळेवर मिळत नसल्याचा शेतकर्‍यांचा आरोप आहे. नक्कल मिळत नाही तोपर्यंत उठणार नाही, असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतल्याने पोलिस बंदोबस्तात तहसीलदारांनी तयार झालेल्या फेरफार नकलांचे वाटप केले.
येथील उपविभागीय कार्यालयात तहसील कार्यालयाचे फेरफार नोंदी देण्याचे कार्यालय आहे. फेरफार नोंदीसाठी अनेक गावचे शेतकरी चार ते पाच दिवसांपासून खेटे मारत आहेत; परंतु काही कर्मचार्‍यांच्या अरेरावीमुळे व काही जण नकलांसाठी अधिकचे पैसे घेत असल्याच्या कारणांवरून शेतकरी संतप्त झाले होते. 

चार ते पाच दिवसांपासून अर्ज करूनही शेतकर्‍यांच्या नकला तयार करण्यात आल्या नव्हत्या. काही कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यांना धक्काबुक्की केल्याचाही आरोप होत आहे. नकला मिळत नाही तोपर्यंत जाणार नाही, असा पवित्रा घेतल्याने मोठा गोंधळ उडाला होता. शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आले. अखेर तहसीलदार योगीता कोल्हे  यांच्या उपस्थितीमध्ये नकलांचे वाटप करण्यात आले.