Tue, Mar 26, 2019 11:40होमपेज › Jalna › कर्जमाफी अर्जांच्या चुकांची दुरुस्ती

कर्जमाफी अर्जांच्या चुकांची दुरुस्ती

Published On: Jan 25 2018 1:02AM | Last Updated: Jan 25 2018 1:02AMजालना : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ज्या शेतकर्‍यांनी ऑनलाइन कर्जमाफीचे अर्ज भरले होते, तसेच अर्ज भरताना शेतकर्‍यांनी चुका झाल्याने ते अपात्र ठरले होते अशा शेतकर्‍यांना अर्जातील चुका दुरुस्त करण्याची संधी देण्यात येणार आहे. यासाठी त्रिसदस्यी समिती नेमण्यात आली असून ही समिती कर्जमाफीचा अंतिम निर्णय घेणार आहे. 

जिल्ह्यात 4 लाख 17 हजार 99 शेतकर्‍यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले होते. त्यात 1 लाख 22 हजार 61 शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 657 कोटी 30 लाख रुपये जमा करण्यात आले. टप्प्याटप्प्याने शेतकर्‍यांच्या बँक खात्यात ही रक्‍कम जमा करणे सुरू आहे. कर्जमाफीचे अर्ज भरताना काही शेतकर्‍यांनी चुकीचे खाते क्रमांक टाकणे, चुकीचा मोबाइल क्रमांक टाकणे यांसारख्या विविध चुकांमुळे त्यांचे अर्ज बाद झाले होते. त्यामुळे त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकला नाही.

17 हजार 585 मिस मॅच डाटा
जिल्ह्यात 17 हजार 585 एवढा मिस मॅच डाटा असून त्यात महाराष्ट्र बँकेची वाढ होणार आहे. अर्जाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने 15 जानेवारी रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेत कार्यशाळा घेऊन त्यात चुकीचे अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी सहकार आयुक्‍त कार्यालयाचे उपनिबंधक दिलीप उढाण यांनी मार्गदर्शन केले. 

यावेळी अर्जातील त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव महाऑनलाइनवर अपलोड करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. बँकेचे शाखाधिकारी, साहाय्यक निबंधक व लेखाधिकारी यांची समिती या अर्जावर पुढील निर्णय घेणार आहे. या निर्णयामुळे ज्या शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज चुकीचे भरले गेले आहेत. त्या शेतकर्‍यांना पुन्हा संधी मिळणार आहे. शेतकर्‍यांकडील ऑनलाइन अर्ज दुरुस्तीसाठी बँकेने शेतकर्‍यांशी संबंध साधून दुरुती करावयाच्या आहेत. 

बँकांची उदासीनता
जिल्ह्यात अद्यापही पुनर्गठण करण्यात आलेल्या शेतकर्‍यांच्या कर्जाबाबत काही बँकांनी पावले उचलली नाहीत. शासकीय आकडेवारीव्यतिरिक्‍तही अनेक शेतकरी कर्जमाफीच्या लालफितीच्या फेर्‍यात आडकल्याचे चित्र दिसत आहे. कर्जमाफीच्या अर्जातील त्रुटी दूर करण्यास काही दिवस लागणार असल्याने या शेतकर्‍यांना कर्जमाफीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 


जिल्ह्यात 164 बँकेच्या शाखा असून 17 हजार 564 शेतकर्‍यांनी ऑनलाइन अर्ज भरताना चुका झाल्याने त्या दुरुस्त करण्यासाठी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. 
- एन.व्ही. आघाव, जिल्हा उपनिबंधक