होमपेज › Jalna › वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू, वनविभागाचा हलगर्जीपणा

वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू, वनविभागाचा हलगर्जीपणा

Published On: Aug 30 2018 1:17AM | Last Updated: Aug 30 2018 12:22AMभेाकरदन : प्रतिनिधी

जालना ते भोकरदन महामार्गावर सोयगाव देवी पाटीवर रविवारी हरणाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने ते हरीण गंभीर जखमी झाले होते. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी वेळेवर न आल्याने हरणाचा मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे यांनी मिळाली. त्यांनी वनविभागाचे कर्मचारी जाधव यांच्याशी फोनवर संपर्क साधून उपचार करण्याची विनंती केली. जाधव यांनी तासात कर्मचारी पाठवतो म्हणून सांगितले होते. हरणावर मोकाट कुत्रे हल्‍ला करतील म्हणून लोखंडे यांच्यासह काही शेतकर्‍यांनी सायंकाळी 6 वाजेपर्यंत हरणाला सुरक्षित ठेवले, परंतु वनविभागाचे कर्मचारी लवकर येतील व काहीतरी उपचार करतील या आशेने सर्वच जण तेथेच बसले होते. मात्र वनविभागाचे कर्मचारी जी. एम. शिनगारे सायंकाळी सहा वाजता आले व हरणाचा पंचनामा करून घेऊन गेले, परंतु संपर्क साधून त्यांना जायला 7 तास लागल्याने हरणाला वेळेत उपचार न मिळाल्याने त्या हरणाचे प्राण गेल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. 

दरम्यान वनविभागाच्या कर्मचार्‍यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे यांनी उपविभागीय अधिकारी हरिश्‍चंद्र गवळी यांच्याकडे निवेदनावद्वारे केली आहे.

तसेच यापूर्वीही 15 जून रोजी वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे सांबर या प्राण्यांवर वेळेत उपचार न झाल्याने तेदेखील दगावले होते, त्यामुळे यापुढे असे होणार नाही यासाठी यांच्यावर योग्य ती कारवाई करून यांना निलंबित करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. या निवेदनावर गजानन शिंदे, कृणाल पवार, महेश अंभोरे, किशोर वराडे, रामेश्‍वर ठाले, बंडू जाधव आदींच्या सह्या आहेत.