होमपेज › Jalna › पीक कर्जाअभावी शेतकर्‍यांची दैना

पीक कर्जाअभावी शेतकर्‍यांची दैना

Published On: Jun 11 2018 12:40AM | Last Updated: Jun 10 2018 11:44PMजाफराबाद ः प्रतिनिधी

राज्यात सर्वत्र 15 जूनपर्यंत जोरदार पावसाचे संकेत आहेत. यामुळे लवकरच पेरण्या सुरू होतील, अशी शक्यता गृहित धरली जात आहे. एकीकडे शेतकर्‍यांची पेरणीसाठी लगबग सुरू असताना त्यांच्या हातात बियाणे, खते खरेदीसाठी पैसे नाहीत. मशागत, पेरणीचे पैसे चुकवायचे कसे असा पेच त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. कर्जमाफी झालेल्यांनाही नवीन पीककर्ज मिळालेले नाही. 

जाफराबाद शहरातील काही बँकानी पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू केली असली तरी काही बँकाचे मात्र शेतकर्‍यांना उंबरठे झिंजवावे लागत आहे. पावसाच्या आगमनामुळे या हंगामाची सुरवात चांगली झाली आहे. येत्या 15 जूनपर्यंत मान्सून सगळीकडे सक्रिय होण्याचा अंदाज असल्याने शेतकरी एकीकडे आनंदलेला असताना दुसरीकडे मात्र पेरणीला लागणारे बी-बियाणे, खते खरेदीसाठी त्याच्या हातात दमडीही नाही. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्यांच्या खात्यात शासनाच्या रकमा जमा झाल्या नसल्याने बँका नवीन पीककर्ज देताना हात आखडता घेत आहेत. काहींच्या खात्यांत कर्जमाफीची रक्कम जमा झाली असली, तरी कागदपत्रांच्या अडचणी, बँकांमध्ये सर्व्हर डाऊन होणे, कर्मचार्‍यांच्या तुटवडा ही कारणे भोवत आहेत. असंख्य बँक शाखांमध्ये दिवसाला केवळ 15 ते 20 प्रकरणे हातावेगळी करत आहेत. प्रामुख्याने ग्रामीण भागातील शाखांमध्ये सध्या सर्वत्र गर्दी बघायला मिळते आहे. असंख्य शेतकर्‍यांना मिळालेली कर्जमाफी ही अजूनही त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. ज्यांची झाली त्यांच्या याद्यांबाबत गोंधळ आहे यामुळे रखडलेले खरीप पीक कर्जाचे वाटप ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर पुन्हा एकदा बँकाचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे.