Fri, Jul 19, 2019 01:24होमपेज › Jalna › ग्रामीण भागात कडकडीत बंद

ग्रामीण भागात कडकडीत बंद

Published On: Aug 10 2018 12:57AM | Last Updated: Aug 10 2018 12:57AMजालना : प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी (दि.9)  महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. यास शहरासह ग्रामीण भागातून शंभरटक्के प्रतिसाद मिळत कडकडीत बंद पाळण्यात आला.
सकाळपासूनच ग्रामीण भागातील मराठा बांधवांनी  बैलगाडी घेऊन आपापल्या भागातील रस्त्यावर ठिय्या दिला. जालना तालुक्यात जामवाडी, गुंडेवाडी, पिंरपिंपळगाव, गोंदेगाव, देवमूर्ती, गोलापांगरी, अंतरावाला या नियोजित जागेवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सकाळी नऊ वाजेापासून ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली. प्रारंभी एक मराठा...लाख मराठा घोषणा देऊन ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली.  ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी ग्रामीण भागातील तरुणांनी मुंडण केले. त्यांचा ठिकाणी सकाळचे जेवणही करण्यात आले. जामवाडी फाट्यावर झालेल्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी भजनाचा ही कार्यक्रम घेण्यात आला. प्रत्येक ठिकाणच्या आंदोलकानी रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली. आनंदगड येथील गणपती मंदिरात लग्न असणार्‍या नववधूसाठी जामवाडी फाट्यावर रस्ता मोकळा करून देण्यात आला. जालना पोलिस ठाण्याच्या वतीने मोठा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. यात तीन पोलिस अधिकारी, 40 पोलिस कर्मचारी आणि 22 होमगार्ड यांचा समावेश आहे.

जामवाडी फाट्यावर भजन करून चक्‍का जाम आंदोलन

जालना-देऊळगावराजा रस्त्यावरील जामवाडी फाट्याव, श्रीकृष्णनगर, पानशेंद्रा आणि जामवाडी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन केले. या ठिकाणी जवळपास तीनशे जणांनी मुंडण केले. आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर स्वयपांक करून जेवण केले. तसेच भजनीमंडळीच्या वतीने भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. रुग्णवाहिकेला, वयोवृध्द यांना रस्ता दिला. या आंदोलन वडार समाजाचे नेते भाऊलाल पवार तर माळी समाजातील बबलू बडदे यांनी मुंडण करून मराठा आंदोलनास पाठिंबा दिला. 

100 पेक्षा अधिक मुंडण

बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी शंभरपेक्षा अधिक तरुणांनी मुंडण करून शासनाचा निषेध केला. रुग्णवाहिकेस रस्ता देऊन शिस्तीचे दर्शन घडविले.औरंगाबाद-जालना महामार्गावर शेलगाव फाट्यावर सकाळपासून ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी शासनाच्या विरोधी जोरदार घोषणाबाजी करत मुंडण करून शासनाचा निषेध केला. या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी सहभागी झाले. 

टायर जाळून रास्ता रोकोपिंपळगाव 

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील सकल मराठा समाजाच्या वतीने भोकरदन रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यवर बैलगाडीसह जनावरेही आणली होती. व्यापार्‍यांकडून बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन समाजाच्या वतीने पारध पोलिस ठाण्याचे सुदाम भागवत यांना निवेदन देण्यात आले. पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

शहागड बसस्थानकावर शुकशुकाट 

येथील बसस्थानकाजवळ टायर जाळून  रास्ता रोको करण्यात आला. बसस्थानकावर शुकशुकाट दिसून आला. महाकाळा येथे गोंदीचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल परजणे यांना निवेदन देण्यात आले. 

कुंभार पिंपळगावात बंद

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापार्‍यांनी आंदोलनास पाठिंबा देत आपली दुकाने बंद केली. तर या भागातील शाळाही पूर्णपणे बंद होत्या. गावात पोलिस उपनिरीक्षक अंकुश पाटोळे, किशोर पाटील, विष्णू कुंटे, संजय राऊत, मधुकर बीक्कड, श्रीराम कावळे, सुनील गाढेकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला. 

वरूड येथे बंदला प्रतिसाद 

भोकरदन तालुक्यातील वरूड बु. येथे टायर जाळून सरकार विरोधी घोषणा देत मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली. वरूड बु ते पिंपळगाव रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. येथील व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी काकासाहेब शिंदे अमर रहे, कोरडे अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी सकल मराठा समाजबांधवांची उपस्थिती होती.

शहापूर

अंबड-बीड गेवराई रस्त्यावरील अंबड तालुक्यातील शहापूर मराठा क्रांती मोर्चाच्यानिमित्त कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने या महामार्गावर ठिय्या आंदोलन केला. तसेच शासनाचा निषेध करत आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात युवकांची सहभाग होता.

सोलापूर महामार्गावर ठिय्या आंदोलन

अंबड तालुक्यातील औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर  सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करून वडीगोद्रीसह अंकुशनगर, महाकाळा, शहागड, गोंदी गावांत कडकडीत बंद  पाळण्यात आला. या भागातील शासकीय कार्यालय, शाळा, बाजारपेठ पूर्ण बंद होती.  वडीगोद्री येथील औरंगाबाद -सोलापूर महामार्गावरील  टी पॉइंटवर सकाळी दहा ते सायंकाळी पाचवाजेपर्यंत महामार्गालगत पॅनडॉल टाकून ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

गुंडेवाडी

जालना-राजूर ररस्त्यावरील गुंडेवाडी फाट्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी युवकांनी मुंडण करून घोषणाबाजी केली. सायंकाळी पाचवाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनात युवक, पुरुष, महिला यांच्यासह बालकांची उपस्थिती होती.