Tue, May 21, 2019 22:10होमपेज › Jalna › बोंडअळी अनुदानापासून शेतकरी अद्यापही वंचित

बोंडअळी अनुदानापासून शेतकरी अद्यापही वंचित

Published On: May 31 2018 1:36AM | Last Updated: May 30 2018 11:02PMभोकरदन : प्रतिनिधी

तालुक्यातील बोंडअळीमुळे हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. या शेतकर्‍यांचे अनुदान बँकेत जमा झाले. मात्र ते मिळत नसल्याने शेतकर्‍यांतून तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे.शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून तालुका प्रशासनाने शासनाकडे 46 कोटी रुपयांचा निधी मिळावा म्हणून प्रस्ताव सादर केला होता. यात पहिल्या टप्प्यातला निधी प्राप्त झाला आहे. अद्यापही शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा मुहूर्त प्रशासनाला सापडला नाही. यामुळे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

भोकरदन तालुक्यातील आठ मंडळांत कापसाची लागवड करण्यात आली होती. शेतकर्‍यांनी मोठी मेहनत घेतल्याने कपाशीचे पीक जोमात आले होते. मात्र या पिकावर अचानक बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेला. गेल्या पाच वर्षांपासून पावसाअभावी दुष्काळाच्या चक्रव्युहात अडकलेल्या शेतकर्‍यांना सामना करावा लागत आहे. त्यातच कपाशीवर बोंडअळीने आक्रमण करून शेतकर्‍यांच्या संकटात आणखी भर टाकली.

तालुक्यातील बोंडअळीचा विषय राज्यभरात गाजला होता. सर्वच राजकीय पुढार्‍यांनी तालुक्यात हजेरी लावली. मदत लवकरात लवकर मिळून देण्याचे आश्‍वासन दिले होते, परंतु आश्‍वासनही हवेत विरले आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या निकषाप्रमाणे बाधित झालेल्या क्षेत्राला 6 हजार 800 रुपये प्रतिहेक्टरी मदत मिळणार आहे. तालुका कृषी अधिकारी डी. बी. व्यवहारे म्हणाले, बाधित शेतकर्‍यांचे अनुदान बँकेत जमा करण्यात आले आहे. गावनिहाय यादी तयार करून दोन दिवसांत पैसे वाटप सुरू होईल.

पेरणी तोंडावर मदतीची प्रतीक्षा!

यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेवर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे बळीराजा नव्या जोमाने खरिपाच्या तयारीला लागला आहे. शेतातील मशागतीची कामे अंतिम टप्प्यात पोहचली असून, आता शेतीकरिता लागणार्‍या खर्चाची तडजोड करण्यात येत आहे. त्यात आठ ते दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या पेरणीसाठी बी बियाणे, खत खरेदीसाठी मोठ्या खर्चाचे नियोजनाची चिंता शेतकर्‍यांना आहे. बोंडअळीची मदत मिळाल्यास खर्च भागवता येईल, अशी आस धरून बसलेल्या शेतकर्‍यांना मात्र प्रशासनाकडे प्रतीक्षा करावी लागत आहे.