Fri, Nov 16, 2018 15:22होमपेज › Jalna › टायगर श्रॉफची नायिका बनवण्याचे आमिष

टायगर श्रॉफची नायिका बनवण्याचे आमिष

Published On: May 21 2018 1:17AM | Last Updated: May 21 2018 1:17AMजालना : प्रतिनिधी

चित्रपटात टायगर श्रॉफची नायिका बनविण्याचे आमिष दाखवून तरुणीची चार लाखांची फसवणूक करणार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हर्षद आनंद सपकाळ ऊर्फ हॅरी सॅप असे आरोपीचे नाव आहे. त्याला  सदर बाजार पोलिसांनी नाशिक येथून सापळा रचून जेरबंद केले.

आरोपीच्या ताब्यातून कारसह अ‍ॅपल कंपनीचे दोन महागडे मोबाइल जप्‍त करण्यात आले. पोलिसांनी आरोपीस न्यायालयात उभे केले असता त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली.  दिल्‍ली येथील इंग्रजी वर्तमान पत्रात बॉलिवूडमध्ये रेम्बो चित्रपटासाठी सुनील बोरा अ‍ॅण्ड इम्पॅक्ट फिल्मस अ‍ॅण्ड प्रा. लिमिटेडतर्फे सह सिनेनायिकेच्या निवडीसाठी जाहीरात प्रसिध्द केली.  जालन्याच्या निवृत्त पोलिस अधिकार्‍याची  मुलगी प्राजक्‍ता सुनील ढाकणे (20, रा. कालीकुर्ती) हिने जाहिरातीच्या आधारे दिल्लीच्या क्रमांकावर संपर्क केला.

त्यानंतर नाशिकहून हर्षद आनंद सपकाळ व दिल्लीहून सुनील बोरा यांनी प्राजक्‍ता यांच्याशी संपर्क साधला. दोघांनी काम मिळवून देतो, असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर अभिनेता टायगर श्रॉफच्या नायिकेची भूमिका मिळाल्याचे तिला सांगण्यात आले. यासाठी गार्डियन फीस व अन्य खर्चासाठी सव्वातीन लाख रुपये लागतील, अशी थाप मारली. प्राजक्ताने दोघांवर विश्वास ठेवून तीन लाख 24 हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. त्यानंतर वेगवेगळ्या फीसच्या नावाखाली वेगवेगळ्या तारखांना एक लाख 27 हजार रुपये उकळले. मात्र वांरवार पैसे देऊनही प्रत्यक्ष शूटिंग होत नव्हते. याबाबत प्राजक्‍ताला संशय आल्यानंतर त्यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.