Thu, Sep 20, 2018 12:46



होमपेज › Jalna › १७ नंबर फॉर्म यंदा शेवटचा

१७ नंबर फॉर्म यंदा शेवटचा

Published On: May 22 2018 1:25AM | Last Updated: May 22 2018 12:12AM



जालना : प्रतिनिधी

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘फॉर्म 17’ चे हे शेवटचे वर्ष ठरणार आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून फॉर्म 17 भरून दहावी-बारावीच्या परीक्षेस बसू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांची परीक्षा मुक्त विद्यालय मंडळ घेणार असल्याचे संकेत आहे. या दिशेने मुक्त विद्यालय मंडळाची रचना तयार करण्याचे कार्य अभ्यास गटाकडून केली जात असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

महाराष्ट्रात दरवर्षी दहावी आणि बारावी मिळून सुमारे एक ते दोन लाख विद्यार्थी 17 क्रमांकाचा फॉर्म भरून परीक्षा देतात. यामध्ये प्रामुख्याने नववीत किंवा अकरावीत नापास झालेले विद्यार्थी आणि काही कारणांनी नियमित शिक्षण घेऊ न शकणार्‍या विद्यार्थ्यांचा समावेश असतो, मात्र ही मुभा शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून बंद करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू आहे. या विद्यार्थ्यांनाही योग्य मार्गदर्शन मिळावे आणि दहावी-बारावीच्या परीक्षेत मूलभूत विषयांबरोबरच आवडीच्या विषयांचीही निवड करता यावी, या उद्देशाने या विद्यार्थ्यांना राज्यात लवकरच सुरू होणार्‍या ‘मुक्त विद्यालय मंडळा’तर्फे परीक्षा देता येणार आहे. 

या विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील 17  क्रमांकाच्या फॉर्मसाठीच्या केंद्रातून मार्गदर्शन मिळत असते. राज्यात नव्याने सुरू होणार्‍या ‘मुक्त विद्यालय मंडळा’कडून परीक्षा देण्याची मुभा देण्यात यावी, असा विचार शासन स्तरावर सुरू आहे. यावर शिक्कामोर्तब झाल्यास फॉर्म 17 भरून परीक्षा देण्यासाठी 2018-19 हे शेवटचे वर्ष ठरणार आहे.  केवळ पाचवी, आठवी, दहावी व बारावीची परीक्षा देऊन व त्यासाठी मोजके विषय निवडून पारंपरिक ‘शिक्षण धर्म’ पाळता येणार आहे. 

दहावीचा अभ्यासक्रम नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच

अतिप्रगत  विद्यार्थी, दिव्यांग, कलाकार, खेळाडू अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि ते मुख्य शिक्षण प्रवाहातही राहावेत, यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मुक्त विद्यालय मंडळ हा राज्य शिक्षण मंडळाचा भाग असेल. त्याद्वारे 2018-19 या शैक्षणिक वर्षांपासून शिक्षण सुरू होणार आहे. याचा अभ्यासक्रम ठरविण्याचे काम जलदगतीने सुरू आहे. या मंडळालाही दहावीचा अभ्यासक्रम हा नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच असावा असाही एक विचार सुरू आहे. यामुळे भविष्यात हा निर्णय झाल्यावर फॉर्म 17 बंद करून या मंडळामार्फत परीक्षा देण्याचा मार्ग खुला होऊ शकणार आहे.