Tue, Apr 23, 2019 10:04होमपेज › Jalna › जिल्हा परिषदेत निधी वाटपाच्या मुद्द्यावर असंतोष

जिल्हा परिषदेत निधी वाटपाच्या मुद्द्यावर असंतोष

Published On: Feb 06 2018 1:45AM | Last Updated: Feb 05 2018 10:44PMजालना : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेत सदस्यांना निधी वाटपाच्या मुद्द्यावर सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या सदस्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपचे सदस्य अवधूत खडके यांनी समाजकल्याण समितीच्या 25 ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या बैठकीच्या विरोधात विभागीय आयुक्‍तांकडे धाव घेत निवड केलेल्या कामास स्थगिती आणली आहे. या सर्व घडामोडींमुळे जिल्हा परिषदेतील राजकीय वातावरण तापू लागले आहे.

जिल्हा परिषदेच्या मिनी मंत्रालयात शिवसेना व राष्ट्रवादी यांची युती असून हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. भाजप मिनी मंत्रालयात विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. जिल्हा परिषदेच्या राजकारणात खोतकर व टोपे यांचे ट्युनिंग चांगले असले तरी विकास निधीतील असमान वाटपावरून सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या सदस्यांची नाराजी वारंवार समोर येत आहे. प्रत्येक बैठकीत बसून, करून घेऊचे आश्‍वासन मिळत असल्याने सदस्यांतील नाराजी कमी झालेली नाही. 

पालिकेतील विकास निधीची खदखद सुरू असतानाच भाजपचे सदस्य अवधूत खडके यांनी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्याच्या योजनेतील निवडीबाबत आक्षेप घेत विभागीय आयुक्‍तांकडे धाव घेतली आहे. या प्रकरणात 25 ऑक्टोबर 2017  रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत निवड केलेल्या कामांच्या प्रशासकीय मंजुरीस उपायुक्‍तांनी स्थगिती दिली आहे. 

याप्रकरणी पुढील सुनावणी 8 जानेवारी 2018 मध्ये ठेवण्यात आली असून तसे पत्र अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा समाजकल्याण अधिकार्‍यांना देण्यात आले आहे. निधीच्या मुद्द्यावर सदस्य एकीकडे भांडत असतानाच दुसरीकडे मार्चपर्यंत दिलेला निधी खर्च न झाल्यास अखर्चित निधी परत जाण्याची टांगती तलवार आहे. समाज कल्याणच्या प्रकरणात सभापती दत्ता बनसोडे यांनी निधीचे नियोजन करूनही अडचणी येत असल्याने अखर्चिक निधीचा प्रश्‍न उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.