Wed, Jan 16, 2019 11:18होमपेज › Jalna › महिलांनी अडवला लोणीकरांचा ताफा

महिलांनी अडवला लोणीकरांचा ताफा

Published On: May 22 2018 1:25AM | Last Updated: May 22 2018 12:06AMजालना : प्रतिनिधी

पाण्याचा प्रश्‍न किती गंभीर आहे, याची प्रचीती आज दिसून आली. पाण्यासाठी महिलांनी पाणीपुरवठा तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचा ताफा हंड्यांनी अडवून खदखद व्यक्त केली. त्यामुळे मतदारसंघातच लोणीकरांवर नामुष्की ओढावली. 

मंठा तालुक्यातील विडोळी येथे रस्त्याच्या व पाईपलाइनच्या कामाचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. हा कार्यक्रम आटोपून पालकमंत्री लोणीकर मंठ्याकडे जात होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास येथील वस्तीवरील पाणी आणि वीज नसल्याने महिला आक्रमक झाल्या होत्या. पालकमंत्री येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांची गाडी अडवण्याचा महिलांचा प्रयत्न होता. याची कुणकुण लागताच लोणीकर यांच्या चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूने घेत तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर महिलांनी रस्त्यावर हंडे ठेवून अधिकारी व पोलिसांचा ताफा अडवला. त्यामुळे पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली. 

धरण उशाला, कोरड घशाला...!

विडोळी येथे गेल्या दोन महिन्यांपासून पाणी व वीज नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी ऐन उन्हात दूरवर भटकंती करण्याची वेळी आली आहे. विडोळी गावालगत निम्न दूधना प्रकल्प आहे. धरण उशाला कोरड घशाला अशी अवस्था झाली होती. त्यामुळे महिला पाण्यासाठी संताप झाल्या होत्या. त्या मोठ्या संख्येने हंडे घेऊन रस्त्यावर उतरल्या.  यावेळी महिलांनी लोणीकर यांना परत बोलविण्याची मागणी करीत संताप व्यक्त केला. पालकमंत्री लोणीकर यांच्या मतदारसंघात महिलांनी पाण्यासाठी आंदोलन केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.