Thu, Apr 25, 2019 12:11होमपेज › Jalna › तुटपुंज्या मदतीमुळे आर्थिककोंडी कायम

तुटपुंज्या मदतीमुळे आर्थिककोंडी कायम

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 17 2018 1:21AMघनसावंगी : प्रतिनिधी

शेतकर्‍यांवरील संकटाची मालिका सुरूच असून, रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यातून सावरण्यासाठी शेतकर्‍यांना तुटपुंजी मदत दिली जात आहे.

तालुक्यातील शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे अवकाळी पाऊस गारपिटीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील वर्षीही अशाच प्रकारे गारपीट झाली होती. लाखात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी केवळ पाच ते दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली होती. त्यामुळे शेतकर्‍यांवरील संकट जैसे थे राहत आहे घनसावंगी तालुक्यात मच्छिंद्रनाथ चिंचोली, डाहाळेगाव, बोडखा, घोंशी यासह आदी 16 गावांतील 1435.15 हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, हरभरा, गहू, केळी, पपई, मोसंबी आदी पिकांना फटका बसला आहे. शासनाच्या आदेशानुसार पंचनामेही सुरू झाले आहेत. घनसावंगी तालुक्यातील शेतकर्‍यांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित विस्कटले आहे. दरवर्षी सावरण्याची आशा असते परंतु कधी दुष्काळ तर कधी गारपीट अशा संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शासनाने जाहीर केलेली मदत त्वरीत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी केली जात आहे.