होमपेज › Jalna › सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; महिलेवर केला चाकूहल्ला

सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; महिलेवर केला चाकूहल्ला

Published On: Sep 07 2018 12:56AM | Last Updated: Sep 07 2018 12:56AMवडीगोद्री : प्रतिनिधी

अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत महिलेवर चाकूचे करून 1 लाख 24 हजारांचा मुद्देमाल लुटून नेला. ही घटना बुधवार, 5 रोजी रात्री साडेअकराच्या  सुमारास घडली.

अंकुशनगर येथील औरंगाबाद -सोलापूर महामार्गालगत गणेश सुरवसे हे  घराच्या गच्चीवर तर त्यांची पत्नी, आई मुलगा, मुलगी व नातू हे घरात झोपले असता बुधवारी रात्री अज्ञात चार सशस्त्र दरोडेखोरांनी  घरात प्रवेश केला. यावेळी  एक जण गच्चीवर चढून गणेश सुरवसे यांना मारण्याचा प्रयत्न केला. मात्र गणेश यांनी त्यांच्यावर  फावडे उगारल्याने दरोडेखोराने तेथून पळ काढला. यावेळी झालेला आरडाओरडा ऐकू येताच गणेश यांच्या पत्नी जयश्री सुरवसे यांनी दार उघडले. 

यावेळी घराबाहेर दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी घरात घुसून जयश्री सुरवसे यांच्यावर  चाकूचा वार करून त्यांना जखमी केले, गणेश यांनाही दरोडेखोरांनी दगडाने मारले. त्यानंतर  घरातील सोने, चांदी व रोख रक्कम मिळून 1 लाख 24 हजार रुपये लुटून नेले. या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात जयश्री गणेश सुरवसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास   नासिर सय्यद हे करत आहे.