Tue, Jun 18, 2019 23:04होमपेज › Jalna › शहरासह इतर २० गावांवर पाणीटंचाईचे संकट

शहरासह इतर २० गावांवर पाणीटंचाईचे संकट

Published On: Jul 13 2018 12:48AM | Last Updated: Jul 12 2018 11:20PMभोकरदन : प्रतिनिधी

पावसाळा लागून जवळपास दीड महिना उलटला. तालुक्यातील अनेक भागांत अद्यापही जोरदार पाऊस झाला नाही. बहुतेक भागातील कोल्हापुरी बंधारे व पाझर तलाव कोरडेच आहेत. शहरासह 20 ते 25  गावांना पाणीपुरवठा करणार्‍या दानापूर येथील जुई धरणात केवळ शहराला महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. त्यामुळे भविष्यात पाऊस न पडल्यास पाणीटंचाईचे संकट समोर दिसत आहे.

आजघडीला जुई धरणात केवळ दोन ते अडीच फूट पाणी आहे. हा पाणीसाठा ऑगस्टपर्यंत पुरेल असा अंदाज आहे. दरम्यान पावसाअभावी धरणात पाणी साठा झाला नसल्याने नगरपालिका प्रशासन देखील चिंतेत आहे. 

इतर काही दिवसांत अशीच परिस्थिती राहिली तर भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्‍त होत आहे. तालुक्यातील बहुतेक भागात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीसाठा कमी झाला असल्याचे चित्र होते. एप्रिल व मे महिन्याच्या कडक उन्हामुळे परिस्थिती आणखीनच भर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे बहुतेक भागाचा पाणीसाठा खालावला असल्याने अनेक भागांत भीषण पाणीटंचाईची स्थिती होती. पावसाळा कधी लागतो अन् या पाणीटंचाई पासून  कधी सुटका होती असे वाटत होते. पावसाळ्याचा दीड महिना उलटला तरी परिस्थिती उन्हाळ्यासारखीच आहे.

अनेक भागांत मोठा पाऊस झाला नसल्याने अनेक ठिकाणचे पाणीसाठे कोरडे असल्याचे दिसून येत आहे. त्यातच यंदाच्या मान्सूने जवळपास एक महिन्याच्या उशिराने तालुक्यातील काही भागांत हजेरी लावली असली तरी म्हणावा तसा जोरदार पाऊस झालाच नाही. एकूणच परिसरात मोठा पाऊस न झाल्याने आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. नगरपालिकेने ही परिस्थिती पाहता नियोजन करण्याची गरज आहे व्यक्त होत आहे. 

जुईसह अन्य जलसाठे कोरडेठाकच

काही ठिकाणी झालेल्या तुरळक पावसावर पेरणी व लागवड झालेली आहे. काही भागातील पिके सध्या बरी असली पावसाची अपेक्षा आहे. आता तर शेतकर्‍यांनी पिकांना मोठा खर्च केला. त्यात पावसाने दडी मारल्याने आणि दोन महिन्यांत पिकांना आवश्यक तेवढा पाऊस पडला नाही तर शेतकर्‍यांवर आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. तालुक्याच्या अनेक भागांत व परिसरात मोठ्या प्रमाणावर कोल्हापुरी बंधारे व पाझर तलाव आहेत. सध्या ते कोरडेठाक झाले आहेत. मागच्या पावसाळ्यामुळे या तलावात व बंधार्‍यामध्ये फेब्रुवारी महिन्यापर्यंत चांगले पाणी होते.

आता मात्र पावसाळा लागूनदेखील काही भागात जोरदार पाऊस झाला नसल्याने या भागातील बंधारे ऐन पावसाळ्यात कोरडेठाक आहेत. आगामी काळात भीषण पाणीटंचाई उद्भवण्याची चिन्हे आहेत. पाणीटंचाईच्या काळात प्रशासनाकडून प्रयत्न झाले तरी पाणी आणावे कोठून हा प्रश्‍न समोर राहणार आहे. बंधार्‍यातील आणि तलावांसह धरणातील पाणी चोरीवर पूर्वीपासून प्रशासनाने अंकुश ठेवला नसल्याने ही परीस्थीती उद्भवल्याचे बोलल्या जात आहे. अनेक भागात सध्या जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा व चार्‍याचा प्रश्‍न उभा राहिला आहे.