वडीगोद्री, (जालना ) : प्रतिनिधी
नाथसागर जलाशयाच्या पाणी साठ्यात १०० टक्के इतकी वाढ झालेली आहे. पैठणच्या जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रात ३० हजार क्यूसेकने आज (ता.२६) सकाळी ५:३० च्या दरम्यान पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी नदीकाठ परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी शशिकांत हतगल यांनी दिला आहे. गोदावरी परिसरात पाणी सोडण्याची ही तिसरी वेळ आहे.
पैठण धरण १०० टक्के भरले. त्यामुळे जायकवाडी धरणामधून आज सकाळी ५:३० वाजता नाथसागराचे १६ गेट्स उघडून सद्यस्थितीत २२५४९ क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडलेले असून एकुन ३० हजार क्यूसेक पर्यंत विसर्ग गोदवारी नदी पात्रात सोडण्यात आला आहे.
सद्यस्थितीत आवक वाढल्याने गेट्समधून मोठ्या प्रमाणात विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहे. तसेच डाव्या कालव्यातून देखील विसर्ग १५०० क्युसेक्सने व उजव्या कालव्यातूनही ९०० क्युसेक्सने विसर्ग सुरूच आहे.
सर्वांनी सतर्क राहावे...
नदीपात्रात कोणीही उतरू नये, वाहने , जनावरे , विद्युत मोटारी पात्रात सोडू नयेत. कोणतीही जीवित/ वित्तहानी होणार नाही याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी. विशेषकरून विद्यार्थी व तरुणांनी नदीपात्रात/पुलाच्या कठड्यांवर सेल्फीसाठी जावू नये, असे जाहीर आवाहन प्रशासनाचे वतीने करण्यात येत आहे .