Tue, Apr 23, 2019 00:43होमपेज › Jalna › पेट्रोल-डिझेल भरताच वाहने पडली बंद 

पेट्रोल-डिझेल भरताच वाहने पडली बंद 

Published On: Jun 03 2018 1:13AM | Last Updated: Jun 02 2018 11:44PMवडीगोद्री : प्रतिनिधी

साधारणत: वाहनात पेट्रोल-डिझेल नसल्यास वाहने चालत नाहीत, मात्र शुक्रवारी इंधन भरल्यानंतर वाहने बंद पडण्याचा प्रकार घडला. त्यामुळे वाहनचालकांची एकच तारांबळ उडाली, तर मेकॅनिकची मात्र चांदी झाली. 

वडीगोद्रीजवळ नागरे यांचा हिंदुस्थान पेट्रोलियम पेट्रोल पंप आहे. औरंगाबाद-बीड महामार्गावर पंप असल्याने येथे पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी वाहनचालकांची नेहमीच वर्दळ असते. शुक्रवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास तीन ते चार वाहनचालकांनी डिझेल भरून वाहन पेट्रोलपंपावरून बाहेर काढताच ते बंद पडले. रात्रीची वेळ व अचानक बंद पडलेल्या वाहनामुळे वाहनचालक हैराण झाले. एक, दोन, तीन अशी एका मागोमाग एक वाहने बंद पडू लागल्याने इंधनात काही तरी खराबी असावी हे वाहनचालकांच्या लक्षात आले. त्यानंतर आजूबाजूच्या मेकॅनिकला वाहनचालकांनी बोंलावून वाहनाच्या फ्युअल पंपची तपासणी करण्यात आली. यावेळी त्यातून डिझेलऐवजी चक्‍क पाणी निघाल्याने वाहनधारक चक्रावून गेले.

पैसे देऊन डिझेलच्या भावात पाणी नशिबी आल्याने शेवटी वाहनचालकांनी आपला मोर्चा पंपचालकांकडे वळवला. ग्राहकांची तक्रार ऐकून पंपचालक हैराण झाला. पंपाच्या हौदाची तपासणी करण्यात आली. काल पडलेल्या पावसाचे पाणी डिझेल टॅँकमधे गेल्याने डिझेलमधे पाणी मिसळल्या गेल्याचे लक्षात आले, मात्र तोपर्यंत ज्या वाहनचालकांनी डिझेल भरले होते त्यांच्या नशिबी पैसे जाऊनही रस्त्यावर वाहन चालू होण्याची वाट पाहणे आले.