होमपेज › Jalna › चांगल्या कामांचे व्यसन करावे

चांगल्या कामांचे व्यसन करावे

Published On: Mar 06 2018 1:18AM | Last Updated: Mar 06 2018 1:14AMभोकरदन : प्रतिनिधी

छत्रपतींच्या काळात तरुणांना व्यसन जडले होते ते स्वराज्य मिळविण्याचे. मात्र आताच्या काळातील तरुणांना वेगळ्याच वाईट सवयी जडल्या आहेत. छत्रपतींचे विचार खर्‍या अर्थाने प्रत्येकाने अमलात आणायचे असेल तर सर्वांनी वाईट सवयी सोडून चांगली कामे करण्याचा संकल्प केला पाहिजे असे आवाहन, छत्रपती महाराजांचे वंशज युवराज तथा खासदार संभाजी राजे यांनी केले.

भोकरदन तालुक्यातील जळगाव (सपकाळ) येथे लोकवर्गणीतून उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे अनावरण युवराज संभाजी राजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे, निर्मला दानवे, जालन्याचे नगरसेवक भास्कर दानवे, सरपंच मधुकर सपकाळ, रमेश सपकाळ, राजेंद्र देशमुख, सभापती विलास आडगावकर आदींची उपस्थिती होती.

हजारोंच्या संख्येने जमलेल्या शिवप्रेमींना मार्गदर्शन करताना युवराज संभाजी राजे म्हणाले की, अलीकडच्या काळात विद्यार्थी आणि तरुणांना इतिहासाची ओळख करून देणे जरूरी झाले आहे. सुटीच्या काळात विद्यार्थ्यांनी गड किल्ल्यांचे पर्यटन केले तर त्यांना महाराजांचा चांगला इतिहास माहिती होईल.  आमदार संतोष दानवे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सर्व समाजासाठी व जाती-धर्मासाठीच असल्याने त्यांचाच आदर्श घेऊन प्रत्येकाने जातीभेद विसरून कार्य करावे. सूत्रसंचालन कृष्णा वाघ यांनी केले तर आभार जे. एस. सपकाळ, आर. ए. सपकाळ व हेमंत सपकाळ यांनी मानले.

राष्ट्रपतींनी केले अभिवादन

या वर्षी दिल्लीत सर्वात मोठी शिवजयंती साजरी झाली आणि कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उपस्थित राहून महाराजांना अभिवादन केले. यावरून महाराजांचे कार्य किती मोठे आहे हेच सिद्ध होते.

अठरापगड जातींनी उभारला पुतळा 

खा.  दानवे म्हणाले, भाजपने नेहमी शिवरायांच्या विचारांवरच समाज घटकांशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप सरकार केंद्रात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच छत्रपती युवराज संभाजी राजेेे यांना खासदारकी देऊन छत्रपती घराण्याचा सन्मान केला. शिवाजी महाराजांचा पुतळा येथील सर्व अठरापगड जातींच्या लोकांनी एकत्र येऊन उभा केला आहे.

कॅबिनेट बैठक रायगडवर घ्या

केंद्र शासनाने गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मोठा निधी दिला असून शिवाजी महाराज खर्‍या अर्थाने समजायचे असतील तर एक कॅबिनेट बैठक रायगडावर घ्यावी, अशी इच्छा देखील छत्रपती संभाजी राजे यांनी या वेळी व्यक्‍त केली.