Mon, Aug 19, 2019 13:23होमपेज › Jalna › दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून मातेने घेतले जाळून

दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून मातेने घेतले जाळून

Published On: Sep 07 2018 12:56AM | Last Updated: Sep 07 2018 12:56AMपरतूर : प्रतिनिधी

पोटच्या दोन निष्पाप चिमुकल्यांना विहिरीत ढकलून देऊन निष्ठूर मातेने जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कंडारी अवचार येथे घडली. यात सहा वर्षीय मुलगी व चार वर्षीय मुलगा मृत्युमुखी पडला. या हृदयद्रावक घटनेने परिसर सुन्न झाला.

सारिका ऊर्फ उमा शरद मुळे (24) असे या निष्ठूर मातेचे नाव आहे. तर शिवराज (6) व शिवानी (वय साडेतीन) अशी चिमुकल्यांची नावे आहेत. घरात कुरबुर झाल्यानंतर गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास उमा मुळे हिने शिवराज व शिवानीला सोबत नेले. ती सरळ शेताच्या दिशेने गेली. येताना मात्र एकटीच परतली. त्यानंतर खोलीमध्ये जाऊन तिने दरवाजा बंद करून स्वत:ला पेटवून घेतले. धूर येत असल्याने ग्रामस्थांनी दरवाजा तोडून उमाला बाहेर काढले. याची माहिती शरद मुळे यास देण्यात आली. तो वाटूर येथील पेट्रोलपंपावर काम करतो. तिला दवाखान्यात पाठवण्यात आले. मुले दिसत नसल्याने शरदला वाटले की शेतात आजी-आजोबासोबत गेलेली असावीत. त्याचवेळी गावात मुलगी पडल्याचे सांगितल्याने नातेवाइकांनी विहिरीकडे धाव घेतली. त्यावेळी दोन्ही मुले पाण्यावर तरंगताना आढळून आली. या दोघांचाही मृत्यू झाला, तर उमा गंभीर असल्याने तिला औरंगाबादच्या  घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. 

या घटनेने गाव सुन्न झाले आहे. या महिलेने टोकाचे पाऊल का उचलले याचा मात्र उलगडा होऊ शकला नाही. याप्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून दोन्ही बालकांचे शवविच्छेदन परतूर येथील  ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने नातेवाईक उपस्थित होते.