होमपेज › Jalna › दोन लाखांचा गांजा पकडला

दोन लाखांचा गांजा पकडला

Published On: Jun 01 2018 1:59AM | Last Updated: May 31 2018 11:37PMजालना : प्रतिनिधी

ट्रकचालकाला बुधवारी रात्री चार जणांनी लुटले होते. त्या तपासासाठी पोलिस अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात गेले होते. त्याच वेळी गांजाबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी 2 लाख रुपये किमतीचा 20 किलो गांजा पकडला. या प्रकरणी बाळू साहेबराव मोहिते (रा. खांदला, ता. मूर्तीजापूर) याला अटक करण्यात आली. 

स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर व त्यांचे सहकारी ट्रकचालकाला लुटमारीचा तपास करण्यास गेले होते. यावेळी खबर्‍याने  एक जण महाकाळा येथे  गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे दोन सरकारी पंच, फोटोग्राफर, वजन काटा मालक यांना सापळयाची माहिती देण्यात आली. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास डोक्यावर एक गोणी घेऊन जाणार्‍या बाळू मोहितेस पोलिसांनी पकडले.

पकडलेला आरोपी मूर्तीजापूर तालुक्यातील खांदला येथील रहिवासी आहे. यावेळी पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ 20 किलो गांजा मिळून आला. या गांजाची किंमत बाजारात 2 लाख रुपये आहे. हा गांजा जप्‍त करण्यात आला असून आरोपीविरुध्द गोंदी पोलिस ठाण्यात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत उपरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. 

ही कारवाई पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलिस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार कैलास कुरेवाड, सॅम्युअल कांबळे, संजय मगरे, प्रशांत देशमुख, रामेश्‍वर बघाटे, रंजित वैराळ, गणेश वाघ, महिला कर्मचारी मंदा बनसोडे, शमशाद पठाण आदींनी केली.