Tue, Apr 23, 2019 13:48होमपेज › Jalna › तूर घोटाळा : 74 जणांवर आरोपपत्र

तूर घोटाळा : 74 जणांवर आरोपपत्र

Published On: May 24 2018 1:32AM | Last Updated: May 23 2018 11:49PMजालना : प्रतिनिधी

शहरात नाफेडच्या तूर खरेदी प्रकरणात गतवर्षी झालेल्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हा पोलिस शाखेच्या वतीने शेतकरी व व्यापार्‍यांसह 74 जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

जिल्ह्यात 2017 मध्ये तुरीचे विक्रमी उत्पादन झाले होते. त्यामुळे भाव खुल्या बाजारात 3200 ते 4200 रुपये प्रतिक्‍विंटलपर्यंत कोसळले होते. या पार्श्‍वभूमीवर नाफेडच्या वतीने जालना, अंबड, परतूर व घनसावंगी तालुक्यांत तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. या केंद्रांत 5 हजार 50 रुपये प्रतिक्‍विंटल भाव देण्यात आला. 

बाजारापेक्षा जवळपास एक ते दीड हजार रुपये भाव जास्त मिळत असल्याने काही व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांशी संगनमत करून जवळपास साडेचार हजार क्‍विंटल तूर बाजारात कमी भावाने खरेदी करून ती शेतकर्‍यांच्या नावावर विकली. यावेळी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्यानंतर ते आरटीजीएसद्वारे परत व्यापार्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे तपासात पुढे आले होते. 

या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक रामनाथ पोेेेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सचिन बारी यांच्याकडे देण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर काही मोठ्या राजकीय नेत्यांची नावे गोवण्यात आल्याने याची चर्चा संपूर्ण राज्यात झाली. 

350 खाती पोलिसांच्या रडारवर दरम्यान हे प्रकरण आर्थिक गुन्हा पोलिस शाखेकडे आल्यानंतर उपअधीक्षक एस. डी. बांगर यांनी या प्रकरणाचा तपशीलवार तपास केला. त्यात नाफेडतर्फे शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची तपासणी करण्यात आली. त्यात पैसे जमा झाल्यानंतर आरटीजीएसद्वारे पैसे ट्रान्सफर केलेली 350 बँक खाती पोलिसांच्या रडारवर आली. त्यातील 120 शेतकर्‍यांनी किराणा दुकानदार अथवा पाइप विक्रेते यांच्या दुकानांच्या नावावर ट्रान्सफर केलेली 120 खाती वगळण्यात आली. 

72 आरोपींनी अटक

तपासात 50 शेतकर्‍यांनी 18 आडत दुकानदारांच्या नावाने तुरीचे पैसे आल्यावर आरटीजीएस केल्याचे समोर आले. त्यात 2241 क्‍विंटल तुरीची विक्री करून 1 कोटी 4 लाख रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणात 74 आरोपींविरुद्ध आर्थिक गुन्हा शाखेच्या वतीने न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. त्यात 72 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 आरोपी फरार आहेत. तूर प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.