Sat, Nov 17, 2018 04:36होमपेज › Jalna › आजपासून तूर खरेदी केंद्र बंद

आजपासून तूर खरेदी केंद्र बंद

Published On: May 16 2018 1:38AM | Last Updated: May 16 2018 1:38AMजालना : प्रतिनिधी

शासनमान्य हमीभाव तूर खरेदी केंद्रावरील तूर खरेदीची मुदत मंगळवार (दि.15) संपल्याने बुधवारपासून तूर खरेदी केंद्र बंद होणार आहे. नोंदणी केलेल्या 8 हजार 454 शेतकर्‍यांपैकी जवळपास 5 हजार शेतकर्‍यांची तूर खरेदी करण्यात आली. उर्वरित 3725 शेतकर्‍यांना कवडीमोल भावाने तूर विक्री करावी लागणार आहे.

जिल्ह्यातील पहिले हमीभाव केंद्र 1 फेबु्रवारीला सुरू झाले. टप्प्याटप्प्याने 15 फेबु्रवारी आठही खरेदी केंद्र सुरू झाले आहे. या खरेदी केंद्रावर आठ हजार 725 शेतकर्‍यांनी नोंदणी केली. यापैकी 5 हजार शेतकर्‍यांकडून जवळपास 47 हजार 560 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. अद्यापही 3 हजार 725 शेतकर्‍यांची तूर खरेदी करणे बाकी आहे. शासनाने18 एप्रिलपर्यंत सुरू केलेली तूर खरेदी 16 मेपासून बंद करण्यात आली. यामुळे तूर शिल्लक असणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. संबंधित शेतकर्‍यांना कवडीमोल भावाने तूर विक्री करावी लागणार आहे. 

तूर खरेदी केंद्रावर शेवटच्या दिवशी जालना, मंठा आणि तीर्थपुरी खरेदी केंद्रावर प्रचंड गर्दी झाली होती. जालना येथील केंद्रावर नोंदणी 3411 शेतकर्‍यांनी केली आहे. तर खरेदी ही दोन हजार पन्नासच्या आसपास झालेली आहे. तीर्थपुरी येथे 1313 शेतकर्‍यांनी नोंदणी केली तर सातशे शेतकर्‍यांची तूर खरेदी करण्यात आली. मंठा येथील 937 शेतकर्‍यापैकी  370 शेतकर्‍यांची तूर खरेदी करण्यात आली. या तीन खरेदी केंद्रावरील शेतकर्‍यांची तूर शिल्लक राहणार आहे.