Mon, Apr 22, 2019 15:47होमपेज › Jalna › शाळा-महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री

शाळा-महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री

Published On: Jun 24 2018 1:33AM | Last Updated: Jun 23 2018 10:38PMभोकरदन : प्रतिनिधी

राज्य सरकारने शैक्षणिक संस्था व शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचे आदेश दिले असताना शहरातील बहुसंख्य शाळांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे शाळा सुरू होऊन पंधरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटला. कारवाईकडे दुर्लक्ष झाल्याने पालकवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाच्या प्रमाणात वाढ होत आहे. तंबाखूमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी केंद्र सरकारने तंबाखूच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी सिगारेट व तंबाखूजन्य नियंत्रण कायदा 2013 तयार केला. याच कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 2015 मध्ये राज्य सरकारने शालेय शिक्षण विभागासाठी स्वतंत्र आदेश काढला. या आदेशानुसार परिसरामध्ये तंबाखूविरहित वातावरण तयार करण्याची जबाबदारी शाळांवर टाकण्यात आली आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीनुसार शाळेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर, सिगारेट फुंकण्यावर बंदी, शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर प्रतिबंध, तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांची माहिती देणारे फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शहरातसह तालुक्यात शाळा सुरू झाल्याने तंबाखूमुक्त शालेय परिसराच्या अंमलबजावणीची पालकवर्गाला अपेक्षा होती. मात्र जिल्हा परिषदेसह खासगी शालेय परिसराचा फेरफटका मारला असता 100 मीटरच्या आतील परिसरात सर्रास तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे पाहायला मिळत आहे.एवढेच नव्हे, तर व्यसनमुक्तीविषयक जनजागृती तसेच प्रतिबंधात्मक फलकही या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत. शालेय परिसरात तंबाखू, गुटख्याच्या पुड्या आढळून येत आहेत.