Mon, Jun 17, 2019 04:13होमपेज › Jalna › व्हॉटस्अप ग्रुपच्या माध्यमातून मुलीला केली 35 हजारांची मदत

व्हॉटस्अप ग्रुपच्या माध्यमातून मुलीला केली 35 हजारांची मदत

Published On: Apr 18 2018 12:49AM | Last Updated: Apr 18 2018 12:49AMटेंभुर्णी : प्रतिनिधी          

सोशल मीडियाचा विधायक कामासाठीही उपयोग होऊ शकतो, याचा अनेकदा प्रत्यय येतो. अशीच एक सुखद घटना व्हाट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून घडली. जाफराबाद तालुक्यातील पितृछत्र हरवलेल्या मुलीला 35 हजारांची मदत व्हाट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यामातून करण्यात आली.

सावरगाव म्हस्के येथील राजू गावंडे या 36 वर्षीय तरुणाचे हृदयविकाराच्या्र झटक्याने निधन झाले होते. शिंपी काम करणारा हा तरुण घरी, फक्त अर्धा एकर जमीन. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब अस्थिर अशी बिकट परिस्थिती. गावातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विनोद कळंबे यांनी व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मृताच्या कुटुंबीयास मदतीचे आवाहन केले होते. त्यानंतर मदतीसाठी अनेक हात पुढे आले आणि 35 हजारांची मदत जमा झाली.  स्व. गावंडे यांच्या मुलीच्या नावे ही रक्कम एका बँकेत फिक्स करण्यात आली आहे. राजू गावंडे हा गावातील प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होणारा उमदा युवक होता. त्यांच्या पश्चात वृद्ध पिता,आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.  

जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विनोद कळंबे यांनी ‘होय मी सावरगावकर’ या नावाचा व्हाट्सअ‍ॅप ग्रुप तयार केलेला आहे. कळंबे यांनी या ग्रुपच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले होते. या ग्रुपचे सदस्य असणारे गावातील शिक्षक, युवक, राजकारणी, सैनिक या सर्वांनी भरभरून मदत केली. याशिवाय अन्य ग्रुप आणि फेसबुकच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनास जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, खासगी शिक्षक, व्यापारी, वकील, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार, व्यावसायिक या सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने 35 हजारांची मदत जमा झाली. 

Tags : Jalna news, WhatsApp Group, Through, Girl, 35 thousand help,