Tue, Jul 23, 2019 11:32होमपेज › Jalna › हजारो क्‍विंटल कापूस घरातच पडून

हजारो क्‍विंटल कापूस घरातच पडून

Published On: Feb 06 2018 1:45AM | Last Updated: Feb 05 2018 10:36PMआन्वा : प्रतिनिधी

भोकरदन तालुक्यात मागील काही वर्षांपासून कपाशीचे लागवड क्षेत्र वाढत चालले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा कल कापूस पिकांकडे वाढला आहे. यावर्षी शेतकर्‍यांनी बोंडअळींच्या तावडीतून वाचलेला कापूस घरी आणला. मात्र, कापसाचे बाजारभाव वाढत नसल्याने तसेच मिळणार्‍या भावात उत्पादन खर्च भरून निघत नसल्याने दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील हजारो क्‍विंटल कापूस घरीच साठवून ठेवला आहे. 

यावर्षी कापसाची खरेदी साडेचार हजार रुपयांपासून सुरू झाली होती. मध्यंतरी हा दर प्रतिक्‍विंटल साडेपाच हजार रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर मात्र भावात घसरण झाली. सध्या बाजारपेठेत 4 हजार 500 ते 4 हजार 600 रुपये प्रतिक्‍विंटल दराने कापसाची खरेदी सुरू आहे. त्यामुळे कमी दर असल्यामुळे त्यातून कापसाचा उत्पादन खर्च भरून निघणे शक्य नाही, अशी माहिती शेतकर्‍यांनी दिली.

कपाशीचे पीक सहा ते आठ महिने शेतात राहात असल्याने त्या शेतात कपाशीव्यतिरिक्‍त दुसरे कोणतेही पीक घेता येत नाही. या हंगामात सुरुवातीला कपाशीचे पीक जोमदार होते. शेतकर्‍यांनी कापसाचा पहिला वेचा घेतल्यानंतर कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. या बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकर्‍यांना महागड्या कीटकनाशकांची फवारणी केली; परंतु फारसा उपयोग झाला नाही.