Wed, Jul 17, 2019 18:35होमपेज › Jalna › यंदा खरिपात पिकांची मोठी फेरपालट

यंदा खरिपात पिकांची मोठी फेरपालट

Published On: May 28 2018 1:43AM | Last Updated: May 27 2018 11:07PMमंठा : प्रतिनिधी  

तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात कापसाचे क्षेत्र सुमारे पाच ते सात हजार हेक्टरने घटणार असून सोयाबीन, तूर आणि मूग या पिकांना शेतकरी पसंती देणार असा कृषी विभागाचा अंदाज आहे. बोंडअळीमुळे निर्माण झालेला कीड प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कापसाला पर्याय म्हणून शेतकरी तूर या पिकाकडे वळत आहेत. दरम्यान, उत्पन्न वाढीसाठी दरवर्षी पिकांची फेरपालट आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मागील वर्षी खरिपासाठी सरासरी 59 हजार 563 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते, परंतु सरासरीच्या 107 टक्के पेरणी झाल्यामुळे प्रत्यक्षात 63 हजार 841 हेक्टरवर खरिपाची लागवड झाली. अचानकपणे कापसावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापसासारखे नगदी शेतकर्‍यांच्या हातून पूर्णपणे गेले. कृषी शास्त्रज्ञांच्या मते पिकांची फेरपालट केली तर कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो म्हणून शेतकर्‍यांनी कपाशीला पर्याय म्हणून तूर पिकाकडे वळले पाहिजे. गतवर्षी शेतकर्‍यांनी कापसाचे महागामोलाचे बियाणे, रासायनिक खते आणि औषध फवारणी केली. कापूस वेचणीसाठी जास्तीची मजुरी देऊनही मजुरांची खुशामत करण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली. कापूस हे नगदी पीक असले तरी त्यासाठी लागणारा खर्च देखील खूप मोठा असल्याने शेतकरी कापसापेक्षा कमी खर्चात येणार्‍या सोयाबीनला पसंती देत आहेत.

यावर्षी हवामान खात्याच्या माहितीनुसार पाऊस वेळेवर येणार असल्याने शेतकरी मुगासारखे कमी कालावधीत येणारे पीक घेण्याच्या तयारीत आहेत. यावर्षी खरीप हंगामासाठी 63 हजार 838 हेक्टर क्षेत्र नियोजित असून सर्वाधिक म्हणजे 36 हजार 455 हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित आहे. तर मागील वर्षीच्या तुलनेत पाचशे ते सातशे हेक्टरने तुरीचे तर हजार हेक्टरने मुगाचे क्षेत्र वाढणार असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारी वरुन स्पष्ट होत आहे.बियाणे खरेदी बाबत शेतकर्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम असून कृषी विभागाने याबाबत शेतकर्‍यांचे मार्गदर्शन करण्यासाठी गावागावातून प्रबोधनात्मक कार्यक्रम घ्यावेत, अशी मागणी होत आहे.

पेरणीपूर्व मशागतीची लगबग

रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाली आहे. खरिपाची पेरणी तोंडावर आल्याने शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी, रोटाव्हेटर फिरवणे, शेणखत देणे, काडीकचरा वेचणे , वखर मारणे यासारखी मशागतीची कामे सुरू आहेत. 

पेरणीबाबत मार्गदर्शन करून  शेतीचे उत्पन्न दुपटीने वाढावे  यासाठी कृषी विभागाच्या वतीने 24 मे ते 7 जून याकाळात उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी योजना प्रत्येक गावात राबवली जात आहे. 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषी विभाग कार्य करीत आहे. उत्पन्न वाढीसाठी प्रत्येक वर्षी शेतकर्‍यांनी पीक फेरपालट करावा.
- ए .टी . सुखदेवे, कृषी मंडळ अधिकारी, मंठा