Thu, Aug 22, 2019 03:52होमपेज › Jalna › तहसीलदार दत्ता भारस्कर यांचा वाळूमाफियांनी घेतला धसका 

तहसीलदार दत्ता भारस्कर यांचा वाळूमाफियांनी घेतला धसका 

Published On: Jul 14 2018 12:55AM | Last Updated: Jul 13 2018 11:53PMवडीगोद्री : प्रतिनिधी 

अंबड तालुक्यात होत असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात तहसीलदार दत्ता भारस्कर व महसूलच्या पथकाने एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत एकूण 15 वाळूमाफियावर कारवाई करीत  52  लाख 97 हजार 200 रुपयांचा दंड आकारला. वाळू चोरीप्रकरणी 11 गुन्हे दाखल करण्यात आले असून महसूलच्या या धाडसत्रामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे. 

अंबड तालुक्यातील गोदावरी पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा चर्चेचविषय ठरत असतानाच तहसीलदार दत्ता भारस्कर व त्यांच्या सहकार्‍यांनी वाळूमाफियाविरोधात रात्री-अपरात्री धाडसत्र सुरू केल्याने अवैध वाळूउपशाला लगाम लागला आहे. वाळूमाफियांना राजकीय वरदहस्त असल्याने महसूलचे अधिकारी व कर्मचारी पूर्वी कारवाई करण्यास घाबरत होते. मात्र तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी वाळूमाफियांची दादागिरी मोडीत काढून कारवाईचा बडगा उगारला. यावेळी उन्मत्त झालेल्या वाळूमाफियांनी सुरुवातीला काही मंडळ अधिकारी व तलाठ्यांना शिवीगाळ व मारहाणीसारखे प्रकार करून महसूलच्या कर्मचार्‍यांत घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

मात्र तहसीलदार भारस्कर यांनी कर्मचार्‍यांच्या पाठीशी उभे राहून वाळूमाफियांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केल्याने महसूलच्या कर्मचार्‍यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण झाला. अंबड महसूल विभागाने अवैध वाळू उपशावर कारवाई करताना महसूलच्या पथकावर  4 हल्ले झाले . त्यात वाळकेश्‍वर येथे नायब तहसीलदार अमित पुरी यांच्यावर, जामखेड फाटा येथे मंडळ अधिकारी जायभाये, गोंदी येथे तलाठी अभिजित देशमुख तर हसनापूर येथे वाळूमाफियांनी हल्ला चढवला होता.

महसूलच्या पथकाने वाळूमाफियांवर केलेल्या कारवाईत 3 पोकलेन, 6 हायवा, 6 ट्रॅक्टर अशी वाहने पकडण्यात आली.  पळून गेलेल्या वाहनांत 1 जेसेबी, 2 हायवा, 3 ट्रॅक्टरचा समावेश असून या वाहनांवरही कारवाई करण्यात आली आहे. अवैध वाळू  प्रकरणी 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहने पळून जाण्याचे 4 गुन्हे असे मिळून 11 गुन्हे दाखल आहेत.

वाळूमाफियांकडे असलेली अद्ययावत यंत्रणा, लोकेशनसह मुजोरी या गोष्टीचा सामना करताना कर्मचारी वर्ग अपुरा पडत आहे. वारंवार अवैध वाळू उपसा व वाहतुकी विरोधात कारवाया केल्या व अचानक धाडी टाकूनही कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही महसूलचे  पथक कारवाई करणार  आहे.- दत्ता भारस्कर, अंबड तहसीलदार