होमपेज › Jalna › नवकवयित्रींना प्रोत्साहन देण्याची गरज 

नवकवयित्रींना प्रोत्साहन देण्याची गरज 

Published On: May 16 2018 1:38AM | Last Updated: May 16 2018 12:18AMजालना : प्रतिनिधी

कविता हा आत्म्याचा शब्द आहे. तो जसा असेल तसा स्वीकारयाला हवा. महिला दमदार लेखन करत आहेत. नवीन कवयित्रींना प्रोत्साहन देऊन मोठे करण्याची गरज आहेे. त्यांना मुक्‍तपणे प्रतिभा व्यक्‍त करू द्यावी, असे प्रतिपादन सेन्सॉर बोर्डाच्या सदस्या व ज्येष्ठ कवयित्री डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी व्यक्‍त केले. हिरकणी ग्रुप व काव्यप्रेमी शिक्षक संघाच्या वतीने येथे पहिले राज्यस्तरीय हिरकणी कवयित्री संमेलन व हिरकणी ग्रंथ प्रकाशन सोहळा मंगळवारी जि. प. प्रा. शाळा मुलांची येथे उत्साहात पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. तडेगावकर बोलत होत्या. 

उद्घाटन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपशिक्षणाधिकारी मंगल धुपे, शिक्षण विस्तार अधिकारी स्नेेहलता साळुंके, डॉ. प्रतिभा श्रीपत, सुनीता पाटील, वनमाला पाटील, मंगला रोकडे, सिंधुताई दहिफळे, लता पवार, कविता नरवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.नगराध्यक्षा संगीता  गोरंट्याल यांनी विवाहापूर्वी असलेला कविता करण्याचा छंद, विवाहानंतर कवितेकडून संगीताकडे झालेला प्रवास उलगडून दाखविला. अशा संमेलनातून नवीन कवयित्रींना त्यांच्या प्रतिभा उंचावण्यास मदत होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. प्रास्ताविकात वनमाला पाटील यांनी प्रतिभासंपन्न असूनही केवळ महिला आहे म्हणून डावलण्यात येते याविषयी खंत व्यक्‍त केली.

यावेळी मंगल धुपे, जया नेहरे, सुनीता पाटील यांनी मनोगत व्यक्‍त केले. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने संमेलनाची सुरुवात झाली. अलका धनकर, अलका धाडे यांनी स्वागत गीत सादर केले. सूत्रसंचालन विजया पाटील यांनी केले तर आभार कविता नरवडे यांनी मानले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सुनीता चव्हाण, संजीवनी वाघमारे, नंदा वल्लाकटी, सारिका जमधडे, सीमा काकडे, ज्योती काकडे आदींनी परिश्रम घेतले. दुसर्‍या सत्रात अनिता कांबळे, लतिका चौधरी, उज्ज्वला कोल्हे, कमल भांबरे, दुर्गा देशपांडे, वर्षा भांदरगे, उषा ठाकूर, डॉ. उज्ज्वला मोटेवार आदींनी सहभाग नोंदविला.

वनमाला पाटीलरचित ‘काशीच्या लेखणींची धार’, ‘इथे बोली भाषेची नगरी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांचे गौरवपूर्ण वर्णन करणार्‍या कवयित्रींनी लिहिलेल्या हिरकणींचा ‘काव्यमयी महाराष्ट्र’ या संग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी प्रतिभावंत कवयित्रींचा हिरकणी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.