Wed, Nov 13, 2019 13:38होमपेज › Jalna › हात-पाय तोडून, डोळ्यात अ‍ॅसिड ओतून बालिकेची हत्या

हात-पाय तोडून, डोळ्यात अ‍ॅसिड ओतून बालिकेची हत्या

Published On: Jun 08 2019 1:56AM | Last Updated: Jun 08 2019 1:28PM
अलिगड : पीटीआय

दहा हजार रुपयांच्या कर्जाच्या वादातून एका दोन वर्षांच्या निष्पाप बालिकेची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील अलिगडजवळ उघडकीस आली आहे. या मुलीचा एक हात आणि एक पाय तोडण्यात आला आहे. डोळ्यात अ‍ॅसिड टाकल्यामुळे दोन्ही डोळे बाहेर आले आहेत. तिचा मृतदेह कचरा कोंडाळ्यात आढळून आला आहे. याप्रकरणी दोघा नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे.  

ही घटना उघडकीस आल्यानंतर तातडीने कारवाई न करता निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या बालिकेवर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचा खुलासा केला आहे. तिचा गळा दाबून अत्यंत क्रूरपणे ठार मारण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या बालिकेच्या माता-पित्यांनी मात्र तिच्यावर अत्याचार झाला असल्याचा संशय व्यक्‍त केला आहे.या बालिकेच्या आजोबाकडून संशयित जाहिद याने पन्‍नास हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. यापैकी चाळीस हजार रुपये त्याने परत केले होते. मात्र, उरलेली दहा हजारांची रक्‍कम परत करण्यास  तो टाळाटाळ करीत होता. तो पैसे देत नसल्याने आजोबांनी त्याला कडक शब्दांत सुनावले होते. त्याचा राग संशयिताच्या  मनात होता. या कुटुंबाचा सूड घेणार असल्याचेही तो वारंवार सांगत होता. त्याप्रमाणे त्याने 30 मे रोजी या मुलीचे अपहरण केले.

अपहरणानंतर त्याने या बालिकेची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. तिचा एक हात आणि पाय तोडला. डोळ्यात अ‍ॅसिड ओतले. त्यानंतर आपला साथीदार अस्लम याच्या मदतीने तिचा मृतदेह एका कचरा कोंडाळ्यात टाकला. या बालिकेच्या आईने माध्यमांशी बोलताना सांगितले की, महापालिकेच्या सफाई कामगाराने आपल्याला सर्वप्रथम ही घटना कळविली. 

योगींचे मंत्री म्हणतात... अशा घटना घडणारच

उत्तर प्रदेशचे कृषिमंत्री सूर्यप्रताप शाही यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्‍त करताना अशा घटना घडणारच, असे म्हणत मुक्‍ताफळे उधळली आहेत. अशा  घटना घडतच असतात, त्यावर आमचे सरकार तातडीने कारवाई करते. त्यामुळेच राज्यातील गुन्हेगारीचा आलेख खाली येत आहे, अशी वल्गनाही त्यांनी केली आहे.