तीर्थपुरी : प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यात नाफेडला तूर विक्री केलेल्या 122 शेतकर्यांचे नाफेडकडे 75 लाख 58 हजार 400 रुपये बाकी असल्याने पैशांसाठी केंद्रावर शेतकरी हेलपाटे मारत आहेत.
तीर्थपुरी परिसरातील 122 शेतकर्यांनी 15 दिवसांपूर्वी नाफेडच्या तूर खरेदी केंद्रात 1392 क्विंटल तूर 5 हजार 450 प्रतिक्विंटलने विक्री केली आहे. माप झाल्यानंतर आठ दिवसांत तुरीचे पैसे मिळतील, असे सांगण्यात आले होते. मात्र पंधरा दिवस उलटूनही अद्याप शेतकर्यांना पैसे मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तुरीचे पैसे लवकर मिळत नसल्याने या खरेदी केंद्राकडे शेतकर्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
14 फेब्रुवारीपर्यंत नाफेडमार्फत तीर्थपुरी केंद्रांवर चोवीस दिवसांत 122 शेतकर्यांची 1392 क्विटंल तूर आापर्यंत खरेदी करण्यात आली आहे. नाफेडकडे 170 शेतकर्यांनी तुरीची ऑनलाइन नोंदणी केली आहे. मात्र वेळेवर पैसे मिळत नसल्याने शेतकरी संतापला आहे. तीर्थपुरी येथे खरेदी केलेली तूर बाजार समितीच्या गोडाऊनमध्ये पडून आहे . नाफेडला गोदाम मिळत नसल्याने तूर बाजार समितीमध्ये पडलेली आहे. असे बाजार समितीकडून सांगण्यात आले आहे. ही तूर आठ दिवसांत येथून हालवली जाणार असल्याची माहितीही सूत्राने दिली आहे.
दहा दिवसांत पैसे खात्यावर जमा होणार..
ज्या शेतकर्यांची तूर खरेदी करण्यात आली आहे, त्यांचे पैसे येत्या दहा दिवसांत शेतकर्यांना मिळतील. पैशाबाबत शेतकर्यांनी काळजी करू नये. - एस. एम. साळवे, नाफेड प्रतिनिधी
तूर विक्री करून आठ दिवस होऊन पैसे मिळाले नाही.
नाफेडच्या केंद्रात तूर विक्री करून महिना उलटला तरी खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. तुरीचे पैसे आठ दिवसखात्यावर जमा होणार असे सांगितले होते. अजूनपर्यंत पैसे न मिळाल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतकर्यांच्या मालाचे पैसे लवकर जमा करावे. - महादेव चिमणे, शेतकरी