Fri, Apr 26, 2019 17:43होमपेज › Jalna › विद्यार्थ्यांनी दिले खाऊचे पैसे

विद्यार्थ्यांनी दिले खाऊचे पैसे

Published On: Apr 17 2018 1:53AM | Last Updated: Apr 17 2018 1:53AMजाफराबाद :  प्रतिनिधी

वॉटर कप स्पर्धेसाठी तालुक्याने कंबर कसली असून यामध्ये चिमुकले विद्यार्थीही मागे नाहीत. खासगाव जिल्हा परिषद प्रशालेच्या 100 विद्यार्थ्यांनी खाऊचे पैसे माती परीक्षणासाठी देत या स्पर्धेत आपलाही खारीचा वाटा नोंदवला आहे. सरपंच संतोष लोखंडे यांच्या विशेष पुढाकारातून आदर्श गाव खासगावने या स्पर्धेत कंबर कसली आहे. या गावातील चिमुकल्यासह उच्चशिक्षित तरुण, महीला, पुरुष व वृध्द मंडळी जोमाने श्रमदान करत असुन गाव पाणीदार करण्यासाठी व प्रथम क्रमाकांचे बक्षीस मिळवण्याचा चंगच खासगाववासीयांनी बांधला आहे. या कामांच्या बाबतीत गावात ग्रामसभाही घेण्यात आली होती. ग्रामसभेस प्रशालेचे काही विद्यार्थीही उपस्थित होते.

ग्रामस्थांची अनास्था, विद्यार्थ्यांचा पुढाकार

माती परीक्षण करण्यासाठी ग्रामस्थ मात्र काहीसे उत्सुक नसल्याचे पाहत आपणच या कामी पुढाकार घ्यावा, असा निर्धार  खासगाव गणेश बिथरे, पल्लवी छडीदार, निर्जला रोडगे, मोनिका सोरमारे यांनी केला. त्यांनी आपला हा मनोदय मुख्याध्यापक यांना सांगितला. माती परीक्षणासाठी येणारा खर्च आमच्याकडे जमा असणार्‍या खाऊच्या पैशातून करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. यासाठी प्रदीप परिहार, मुख्याध्यापक भिवसन पवार, संजय गवते, किशोर तबडे, व्ही.व्ही. पाटील, सोनूने, काळे हे मार्गदर्शन करत आहेत.

Tags : Jalna, money, given, students