Mon, Jul 15, 2019 23:40होमपेज › Jalna › मृग कोरडे; शेतकर्‍यांचे आर्द्रावर डोळे

मृग कोरडे; शेतकर्‍यांचे आर्द्रावर डोळे

Published On: Jun 21 2018 1:25AM | Last Updated: Jun 21 2018 12:35AMभोकरदन : प्रतिनिधी

खरीप हंगामासाठी व पावसाळ्यातील मृग नक्षत्र जवळपास कोरडे जात असल्याने मूग आणि उडीद पीक रामभरोसे झाले आहे. पहिल्याच नक्षत्रात पावसाने दडी मारल्याने लांबलेल्या पेरणीमुळे बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. परिणामी यंदा उन्हाळाच सरला नसल्याचे चित्र तालुक्यात पाहवयास मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे डोळे आता आद्रा नक्षत्राकडे लागले आहे. 

21 जून उजाडला तरी तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला नाही. एक-दोनदाच वरुणराजाने हजेरी लावली. मृगनक्षत्राच्या पूर्वसंध्येला आणि मृग नक्षत्राच्या दिवशी पावसाचा एकही थेंब पडला नाही. या नक्षत्रात हत्ती वाहन असल्याने अधिक पावसाचा अंदाज बांधता येणार नाही. 6 जुलैपासून पुनर्वसू नक्षत्रात वाहन बेडूक मध्यम स्वरूपाच्या पावसाची गरज असते. बेडकामुळे पावसाचा अंदाज बांधता येईल. पिके लहान असल्यामुळे मोठ्या पावसाची गरज नसते. पुष्य नक्षत्र 20 जुलैपासून सुरुवात होत आहे. 3 ऑगस्ट रोजी आश्‍लेषा नक्षत्रास सुरुवात होणार असून त्याचे वाहन घोडा आहे. त्यानंतरच्या मघा, पूर्वा, उत्तरा या तीन नक्षत्रांत पावसाची शक्यता कमीच आहे. यंदा पावसासाठी शेतकर्‍यांना धावा करावा लागत आहे. आणखीच पाऊस लांबला तर उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

65 ते 80 मि. मी. पावसाशिवाय पेरणी नको : कृषी विभाग

तालुक्यात 65 ते 80 मि. मी. पाऊस आल्याशिवाय शेतकर्‍यांनी शेतात पेरणी करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी डी. बी. व्यवहारे यांनी केले आहे.