Sun, Jun 16, 2019 12:10
    ब्रेकिंग    होमपेज › Jalna › तंटामुक्ती मोहीम ३ वर्षांपासून थंडावली

तंटामुक्ती मोहीम ३ वर्षांपासून थंडावली

Published On: Apr 29 2018 2:09AM | Last Updated: Apr 29 2018 1:25AMभोकरदन : प्रतिनिधी

गावातील तंटे गावातच मिटवावेत, गावोगावी शांतता नांदावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव  मोहीम सुरू केली. त्यानुसार प्रत्येक गावात तंटामुक्त समित्या स्थापन करण्यात आल्या. या मोहिमेला प्रारंभी उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. 

परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून भोकरदन तालुक्यात तंटामुक्त मोहीम थंडावली असून गावातील तंटामुक्त समित्या केवळ कागदांवरच राहिल्या असल्याने तंट्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे तंटामुक्तीची चळवळ गतिमान करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

छोठ्या मोठ्या कारणावरून निर्माण होणारे तंटे वेळीच मिटवले नाहीत तर ते मोठे स्वरूप धारण करतात. त्यानंतर क्षुल्लक कारणावरून पोलिस प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागतात. यात वेळ, पैसा, मानसिक स्वास्थ गमवण्याची वेळ येते. दारूमुळे हे सर्व घडत असते. 

म्हणून दारूचे समूळ उच्चाटन व्हावे, गावा-गावांत शांतता नांदावी यासाठी दिवंगत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी 2006 मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. ग्रामीण भागात सुरू केलेली मोहीम यशस्वीरीत्या सुरू झाल्यानंतर काही वर्षे प्रभावीपणे राबविण्यात आली. 

गठित समित्या कागदावरच 

तंटामुत्ती मोहिमेकडेच पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे तंटे वाढत असून तंटामुक्त समिती अध्यक्ष व समित्याही याबाबत उदासीन आहेत. खर्‍या अर्थाने आदर्श गावाची निर्मिती करावयाची असेल तर राज्य शासनाने याकडे लक्ष देऊन पुन्हा एकदा तंटामुक्त चळवळीला उभारी देण्याची गरज आहे. यामुळे गाव परिसरात वाद गावातच मिटू शकतील.