Thu, Jul 18, 2019 16:32होमपेज › Jalna › दीड महिना उलटूनही गुरुजी प्रशिक्षणाविना

दीड महिना उलटूनही गुरुजी प्रशिक्षणाविना

Published On: Jul 31 2018 1:31AM | Last Updated: Jul 31 2018 1:31AMजालना : अप्पासाहेब खर्डेकर

शैक्षणिक वर्ष 2018-19 करिता इयत्ता पहिली, आठवी व दहावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. दहावीसाठी शिक्षकांना एप्रिल महिन्यातच प्रशिक्षण देण्यात आले, परंतु पहिली व आठवीच्या शिक्षकांना कुठलेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे शाळा सुरू होऊन तब्बल दीड महिना लोटला आहे. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून यासाठी जबाबदार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

पहिली व आठवीचा अभ्यासक्रम चालू शैक्षणिक वर्षांपासून बदलला आहे. अभ्यासक्रमातील बदल, विषय शिक्षकांना समजून घेण्यासाठी पाठ्यपुस्तक मंडळाकडून प्रशिक्षण दिले जाते. नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन तब्बल दीड महिना झाला तरी बदललेल्या अभ्यासक्रमाचे कुठलेही प्रशिक्षण शिक्षकांना दिले गेले नसल्याचे समोर आले आहे. प्रशिक्षण ऑनलाइन मिळणार आहे का ऑफलाइन हाही पेच शिक्षकांपुढे निर्माण झालेला आहे.  पाठ्यपुस्तक  मंडळाकडून यावर्षी पहिली व आठवीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला. प्रशिक्षण उन्हाळ्यात होणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. याचा परिणाम अध्ययनावर झाला आहे. नवीन अभ्यासक्रमामुळे शिक्षकांमध्ये शिकवण्यासाठी संभ्रम निर्माण झालेला आहे. पाठ्यपुस्तक  मंडळाच्या हलगर्जीपणाचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. शिक्षण क्षेत्रातील  बदल, वेळोवेळी घेतलेले निर्णय, निष्काळजीपणा, नियोजनाचा अभाव याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. 

शिक्षकांसहीत पालकही संभ्रमात

कोणता विषय कसा शिकवायचा, पुस्तकातील गाभा घटक किती महत्त्वाचा आहे, पाठ्यपुस्तक मंडळाने काय महत्त्वाचे बदल केले आहेत, अध्यापन पद्धती, पुस्तकांचे अंतरंग, बाह्यरंग आदी बाबी या प्रशिक्षणातूनच स्पष्ट होतात, यामुळे शिक्षकांसहित पालक संभ्रमात आहे.

तज्ज्ञही अनभिज्ञ : याबाबत राज्यस्तर, विभाग, जिल्हा, तालुका स्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शकांना प्रशिक्षण दिले जाते, परंतु सर्व तज्ज्ञ प्रशिक्षणाबाबत अजूनही अनभिज्ञ आहेत हे विशेष! यामुळे शिक्षण विभागाचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे.

विद्यार्थ्यांना पडला अभ्यासाचा प्रश्‍न

जिल्हाभरात पहिलीच्या विद्यार्थ्यांना भाषा, गणित, इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आलेले आहे. मात्र, कशा पद्धतीने अभ्यास करावा, याबाबत विद्यार्थी- पालकांना प्रश्‍न विचारून भंडावून सोडत आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकदेखील संभ्रमावस्थेत आहेत.
प्रशिक्षणाचे नियोजन, तारीख लवकरच

पहिली व आठवी प्रशिक्षणाबाबतचा कार्यक्रम तयार झाला आहे. मात्र, त्याची तारीख वरिष्ठांकडून आलेली नाही. आमचे जिल्ह्याचे नियोजन तयार आहे. वरिष्ठांकडून सूचनेनुसार प्रशिक्षण घेण्यात येईल. पंचायत समितीमार्फत ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण घेण्यात येईल.
- डॉ. जगराम भटकर, प्राचार्य, 
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण विभाग