जालना : प्रतिनिधी
समाज परिवर्तनासोबत सर्व भारतीयांना आर्थिक मुक्ती मिळवून देणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन होते. ते यशस्वी करण्यासाठी अनुयायांनी धर्मकारणाबरोबरच राजकीय शक्ती वाढवून राजसत्ता ताब्यात घ्यावी, असे आवाहन यवतमाळ येथील बिरसा क्रांती दलाचे संस्थापक दशरथ मडावी यांनी केले. डॉ. आंबेडकरांनी केवळ दलित व आदिवासींसाठी कार्य केले नसून समग्र भारतीयांच्या उत्थानासाठी योगदान दिले आहे. मात्र गनिमी काव्याने त्यांचे कार्य संकुचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
येथील फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत मंगळवारी (दि. 10) बहुजनांच्या एकतेचे सूत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयांवर तिसरे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तहसीलदार विपीन पाटील हे होते. डॉ. राजेंद्र गाडेकर, व्याख्यान मालेचे अध्यक्ष सुभाष मस्के, सचिव सतीश वाहुळे, मिलिंद कांबळे, हरीश रत्नपारखे, प्रशांत आढाव, डी. आर. सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
मडावी म्हणाले की, 1950 नंतर आरक्षण लागू झाले. ज्यांनी डॉ. आंबेडकरांचे तत्त्वज्ञान स्वीकारले, त्यांनी गरूड झेप घेतली. या उलट आदिवासींनी गांधी मार्ग स्वीकारल्याने त्यांची अधोगती झाली. बाबासाहेब हे सर्व जनांचे नेते कशा पद्धतीने होते, याची उदाहरणांसह मडावी यांनी उकल केली. 1936 साली शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी सर्वप्रथम स्वतंत्र मजूर पक्षाने मोर्चा काढून शेतमजुरांना योग्य वेतन मिळावे, भूक बळी जाणार नाही, अशी व्यवस्था शासनाने करावी. सावकारांवर निर्बंध लादून कुळस्वामींना त्यांचा अधिकार मिळावा, यासाठी खोती निर्मूलन बिल आणले; पण कुळस्वामींनीच आंबेडकरां विरुद्ध आंदोलन केले, असे सांगून लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी 1938 साली कुटुंब नियोजन बिल डॉ. आंबेेडकरांच्या पक्षाने आणल्यावर त्यास सर्वांनी विरोध केला.
आज त्याची जाणीव होते. अर्थव्यवस्था नियंत्रित करण्यासाठी आरबीआयची निर्मिती बाबासाहेबांनी केली. जलवाहतूक प्रकल्पाची संकल्पना सर्वप्रथम त्यांनी मांडली होती. हिंदू कोड बिल, महिला स्वातंत्र्याचा जाहीरनामा केल्यानंतर महिलांनीच आंदोलन केले. ओबीसींना आरक्षणासाठी तरतूद केली. शासन हिंदू कोड बिल लागू करत नसल्यानेच आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. याची जाणीव ओबीसींनी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दीपक बुक्तरे यांनी केले तर डी. आर. सावंत यांनी आभार मानले.
Tags : Jalna, possession, kingdom