Sun, Jul 21, 2019 16:23
    ब्रेकिंग    होमपेज › Jalna › अधिकाधिक शेतकर्‍यांचा पीकविमा घ्या

अधिकाधिक शेतकर्‍यांचा पीकविमा घ्या

Published On: Jul 26 2018 1:32AM | Last Updated: Jul 22 2018 11:53PM जालना : प्रतिनिधी 

पीकविमा भरून घेण्यासाठीची मुदत 24 जुलैपर्यंत असून जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका व आपले सरकार केंद्रांनी शर्थीचे प्रयत्न करुन जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकर्‍यांचा पीकविमा भरून घ्यावा. या कामी कृषी विभाग, सहकार विभाग तसेच मार्केट कमिटी समन्वय साधून शेतकर्‍यांचा पीकविमा भरून घेण्यास सहकार्य करण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पीकविमा, कर्जमाफी व बोंडअळी अनुदान वाटपासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पालकमंत्री लोणीकर बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एन.व्ही. आघाव, अग्रणी बँक व्यवस्थापक ईलमकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध बँकांचे व्यवस्थापक उपस्थित होते. 

पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, पीकविमा भरण्यासाठी कमी कालावधी शिल्लक राहिला आहे.  गतवर्षी  मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारामुळे जालना जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा पीकविमा ऑफलाइन भरून घेण्यासाठी केंद्र शासनाकडून परवानगी मिळाली होती,  परंतु यावर्षी शेतकर्‍यांचा पीकविमा हा ऑनलाइनच भरून घेण्यात येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 65 शाखांपैकी केवळ 13 शाखांमध्येच ऑनलाइन पद्धतीने पीकविमा भरून घेण्याची सोय उपलब्ध आहे.  तसेच मध्यवर्ती बँकेकडे अत्यंत कमी मनुष्यबळ असल्याने मध्यवर्ती बँकेच्या उर्वरित शाखेमधील शेतकर्‍यांचा पीकविमा भरण्याचे काम जिल्ह्यातील इतर राष्ट्रीयीकृत बँकेने करण्याबरोबरच ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पीकविमा भरून घेण्याच्या सूचना देत एकही शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहणार नाही. याची दक्षता घेण्याचे निर्देशही बँक अधिकार्‍यांना दिले.

 263 कोटींचे अनुदान मंजूर

बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानापोटी जिल्ह्यासाठी 263 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून ही मदत तीन टप्प्यांत देण्यात येणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील 73 कोटी रुपयांच्या मदतीची रक्कम प्रशासनास प्राप्त झाली. ही रक्कम विविध बँकांमार्फत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आली. दुसर्‍या टप्प्यातील 110 कोटी रुपयांची रक्कम जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेली आहे. तालुकानिहाय तहसीलदारांना वितरित करण्यात आली आहे. लवकरच ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.