Tue, Jul 23, 2019 06:33होमपेज › Jalna › मोसंबी पोहचली 35 हजार रुपये टनावर

मोसंबी पोहचली 35 हजार रुपये टनावर

Published On: Mar 24 2018 2:13AM | Last Updated: Mar 24 2018 1:48AMजालना : प्रतिनिधी

येथील कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या मोसंबी मार्केटमधे मोसंबीच्या भावात मोठी वाढ झाली असून, हे भाव 25 ते 35 हजार रुपये टनापर्यंत गेले आहेत. मोसंबींच्या भावात वाढ झाल्याने मोसंबी उत्पादक शेतकर्‍यांना मोठा फायदा होणार आहे.

जिल्ह्यात या वर्षी भाजीपाल्यासह शेतीमालाचे भाव कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. डाळिंब, द्राक्षांसह इतर फळबागांचे भाव कमी होत असतानाच मोसंबीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी अडकन्या बहाराला 24 ते 30 हजार रुपये प्रतिटन तर मृग बहार मोसंबीस 30 ते 35 हजार रुपये प्रतिटन भाव मिळाले. एक महिन्यापूर्वी 10 ते 15 हजार रुपये प्रतिटनापर्यंत भाव कमी असतानाच मागील आठ दिवसांपासून मोसंबीची आवक कमी झाल्याने भावात अचानक वाढ झाली आहे. जालना मोंढ्यात सध्या दररोज दीडशे टन मोसंबीची आवक होत आहे. दररोज दिल्‍ली, जयपूर, मथुरा व गाझीयाबादसह हैदराबाद येथे दररोज मोसंबी पाठवली जाते. 2012 मधे पडलेल्या दुष्काळानंतर मोसंबीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. दुष्काळात पाणी नसल्यामुळे 36 हजार हेक्टरवरून मोसंबीचे क्षेत्र 18 हजार हेक्टरपर्यंत खाली आले आहे. मोसंबीला मोठी मागणी असतानाच आवक कमी असल्याने भाव वाढल्याची माहिती मोसंबी व्यापार्‍यांनी दिली. शेतकर्‍याचीं आलेली मोसंबी दररोज लिलाव पध्दतीने विकली जाते. मोसंबीच्या खरेदी विक्रीतून कृषी उत्पन्‍न बाजार समितीतील दहा ते बारा अडतीयांसह हमाल, मोसंबी छाटणी करणार्‍या महिला व ट्रकचालकांना मोठा रोजगार मिळतो.

 मोसंबी विक्रीतून दररोज 35 ते 40 लाख रुपयांची उलाढाल होत असल्याने या व्यवसायातून कृषी उत्पन्न बाजार समितीलाही मोठे उत्पन्न मिळते. जालन्याच्या न्यू सेलर मोसंबीला संपूर्ण भारतातून  मोठी मागणी आहे. पातळ साल अन गोडवा यामुळे या मोसंबीने सर्वत्र वेगळी ओळख निर्माण केली आहे.