Sat, Feb 16, 2019 10:40होमपेज › Jalna › बोगस बियाणे विक्रीला आळा घाला 

बोगस बियाणे विक्रीला आळा घाला 

Published On: Apr 10 2018 1:16AM | Last Updated: Apr 10 2018 12:25AMजालना : प्रतिनिधी

शेतकर्‍यांना पेरणीसाठी देण्यात येणार्‍या बि-बियाणांच्या वाणाचा दर्जा उत्तम राखण्यात यावा.  शेतकर्‍यांना दर्जाहीन बियाण्यांची विक्री करणार्‍या दुकानदारांसह उत्पादकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री बबन लोणीकर यांनी दिल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित खरीप हंगाम 2018 च्या पूर्वतयारी आढावा बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा, जिल्हा पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, राजेश जोशी,  संतोष धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पुढे  पालकमंत्री  लोणीकर म्हणाले की, प्रत्येक पात्र व गरजू शेतकर्‍याला पीककर्ज मिळावे व दलालांचा कुठलाही हस्तक्षेप यामध्ये होऊ नये यासाठी बँकांनी प्रत्येक शाखेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. महसूल तसेच कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी वेळोवेळी बँकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. बँकांनी उद्दिष्टानुसार शेतकर्‍यांना पीककर्जाचे वाटप करावे. या कामात हयगय अथवा टाळाटाळ करणार्‍या बँकेविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशाराही पालकमंत्री  लोणीकर यांनी दिला.  शेतकर्‍यांना दर्जेदार खते मिळावीत, खत वाटपामध्ये पारदर्शकता यावी यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर ई-पॉस मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  दर्जेदार व रास्त भावामध्ये बी-बियाणे व खते मिळावीत यासाठी तसेच त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी ग्रामस्तरावर ई-पॉस मशिनबाबत जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. 

Tags : Jalna, Stop, selling, bogus, seeds