Tue, Jun 18, 2019 20:22होमपेज › Jalna › जालना बाजार समितीत संगणकीकृत लिलाव प्रणालीस प्रारंभ

जालना बाजार समितीत संगणकीकृत लिलाव प्रणालीस प्रारंभ

Published On: Jan 29 2018 12:59AM | Last Updated: Jan 29 2018 12:53AMजालना ः प्रतिनिधी

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संगणकीकृत लिलाव प्रणालीस सुरुवात झाली आहे. शेतकर्‍यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती अर्जुन खोतकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, जागतिक बँक, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प व कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संगणकीकृत लिलाव पद्धतीची सुरुवात करण्यात आली आहे. संगणकीय लिलाव पद्धतीमुळे सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने केले जाणार आहेत. बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांना शेतमालाची माहिती एसएमएसद्वारे कळविली जाणार आहे. ज्या अडत दुकानात माल उतरेल त्यांची संगणक नोंदणी झाल्यानंतर त्या अडत दुकानात माला लिलाव होऊन दर व वजन एसएमएसद्वारे कळविले जाणार आहे. शेतकर्‍यांना शेतमालाची रक्कम त्या दिवशी थेट ऑनलाइन पद्धतीने खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे सध्या बाजार समितीमध्ये शेतीमाल विक्रीस आणल्यानंतर मुख्य प्रवेशद्वार येथे नोंदणी करण्याचे काम सुरू झाले आहे.

नोंदणीसाठी ही कागदपत्रे गरजेची

शेतमाल विक्रीसाठी शेतकर्‍यांकडे आधारकार्ड, मोबाइल नंबर, बँक पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत असणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांची एकदा नोंदणी झाल्यानंतर ती कायम राहणार आहे.

संगणकीय लिलाव पद्धतीचे फायदे

शेतमाल विक्रीमध्ये पारदर्शकता येऊन शेतकर्‍यास रास्त दर मिळेल. शेतमाल विक्रीची रक्कम थेट खात्यात जमा होईल. शेतमाल विक्रीसंदर्भातील माहिती एसएमएमद्वारे मिळेल. समितीत शेतमाल विक्री करणार्‍या शेतकर्‍यांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार मिळेल. शासनाने भविष्यात शेतकर्‍यांसाठी काही योजना जाहीर केल्यास नोंदणीकृत शेतकर्‍यांनाच त्याचा लाभ मिळू शकेल.