Wed, Apr 24, 2019 07:36होमपेज › Jalna › ‘रुरबन’मधील विकासकामांना गती द्या

‘रुरबन’मधील विकासकामांना गती द्या

Published On: May 15 2018 1:33AM | Last Updated: May 15 2018 1:33AMजालना/आष्टी : प्रतिनिधी

राष्ट्रीय रुरबन मिशन प्रकल्पांतर्गत आष्टीसह 16 गावांत करण्यात येणारी कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याबरोबरच या कामांना गती देण्याचे द्या. कामात दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री बबन लोणीकर यांनी दिली. राष्ट्रीय रुरबन योजनेसंदर्भात परतूर तालुक्यातील आष्टी येथेे आढावा बैठकीत पालकमंत्री  लोणीकर बोलत होते. मंचावर मदनलाल सिंगी, सुदाम प्रधान, प्रदीप ढवळे, सरपंच सादेक, रामप्रसाद थोरात, अर्जुन राठोड, रंगनाथ येवले, सिद्धेश्वर सोळंके, सुरेशे आदींची उपस्थिती होती.

लोणीकर म्हणाले की, 16 गावांत वीज सुरळीत होण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.  आवश्यक त्या ठिकाणी खांब बदलण्याबरोबरच केबलही टाकण्यात येत असून या कामांना गती देण्यात यावी. शेतकर्‍यांसाठी स्थापन करण्यात येत असलेल्या मिनी एमआयडीसीला अखंडित विजेचा पुरवठा होण्यासाठी एक्स्प्रेस फीडरचे अंदाजपत्रकही सादर करण्याच्या सूचना विद्युत विभागाला यावेळी पालकमंत्री  लोणीकर यांनी दिल्या. 

रुरबनमध्ये समावेश करण्यात आलेल्या 16 गावांत सांडपाणी तसेच घनकचरा व्यवस्थापनचा प्रकल्प करण्यात येणार असून शिवणी गावात सांडपाणी व्यवस्थापनाचा उत्कृष्ट असे काम करण्यात आले असल्याचे उदाहरण देत प्रकल्पामध्ये समाविष्ट गावातसुद्धा शिवणीप्रमाणेच कामे करण्याची सूचना त्यांनी दिल्या. ज्या ज्या ठिकाणची कामे प्रलंबित असतील  ते 20 दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. 

जमिनीची धूप थांबून पावसाचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनामार्फत वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला असून या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. आष्टीसह 16 गावांमध्येही वृक्ष लागवड करण्यात यावी. केवळ वृक्षांची लागवड करून चालणार नाही तर लागवड केलेले वृक्ष जगली पाहिजेत यासाठीही आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश लोणीकर यांनी संबंधित विभागाला दिले.