Thu, Nov 15, 2018 20:03होमपेज › Jalna › पावसाची पाठ; वाकडी परिसरात शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट

पावसाची पाठ; वाकडी परिसरात शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट

Published On: Jul 05 2018 1:37AM | Last Updated: Jul 04 2018 11:17PMवाकडी : प्रतिनिधी

भोकरदन तालुक्यातील वाकडी येथील शेतकर्‍यांवर पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची भीती असल्याने शेतकरी चिंतित झाले आहेत. चालू हंगामात पाऊस वेळेवर व 100 टक्के पडणार असल्याचे भाकीत हवामान विभागाने काही महिन्यांपूर्वीच वर्तविले. यावर विसंबून बर्‍याचशा शेतकर्‍यांनी पेरणी केली, परंतु गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरणीनंतर अंकुरलेले पिके  कडक उन्हामुळे  करपण्याच्या वाटेवर आहे. दुबार पेरणीचे संकट उभे ठाकल्याने शेतकर्‍यांच्या झोपा उडाल्या आहेत. कर्जाच्या कचाट्यात सापडलेल्या बळीराजावर आता दुबारच्या दुहेरी संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे

मृगानंतर आर्द्राही कोरडेच?

8 जून रोजी मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर केवळ एक दोन वेळा पाऊस पडल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून वरुण राजाने दडी  मारली. त्यानंतर 22 जूनपासून आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झालेली असून परिसरात अद्यापही पावसाने हजेरी लावलेली नसल्याने मृगानंतर आर्द्राही कोरडेच जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. शेतात सिंचनाची सोय नसल्याने अंकुरलेल्या पिके करपण्यापासून कसे वाचवावे या विवंचनेत  शेतकरी सापडला असून वरुणराजाची आतुरतेने वाट बघत आहेत.