Sat, Apr 20, 2019 10:03होमपेज › Jalna › ‘हेच का अच्छे दिन’! इंधन दरवाढीवर सोशल मीडियात टीका

‘हेच का अच्छे दिन’! इंधन दरवाढीवर सोशल मीडियात टीका

Published On: May 29 2018 1:40AM | Last Updated: May 28 2018 11:41PMजालना : प्रतिनिधी

पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्यामुळे नेटिझन्स आक्रमक झाले आहेत. ‘हेच का अच्छे दिन’ म्हणत बोचरी टीका केली जात आहे. विविध व्हिडिओ, चित्रांचा उपयोग करून दरवाढीची दहाकता सांगितली जात आहे. तसेच मोदी समर्थकही या टीकेला प्रत्युत्तर देत असून काँग्रेसच्या काळातील महागाईची आठवण करून दिली जात आहे. 

पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाल्यानंतर विरोधी पक्षाने सरकारला टीकेचे लक्ष्य केले आहे. विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. यासोबतच अपेक्षेप्रमाणे सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटत आहेत. नेटिझन्स व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकच्या माध्यमातून सरकारवर जोरदार टीका करत आहेत. सध्या प्रत्येक ग्रुप व पेजवर पेट्रोल व डिझेल दरवाढीची चर्चा अधिक रंगत आहे. सरकारचे समर्थक व विरोधक एकमेकांवर टीकास्त्र सोडून हिरीरीने बाजू मांडत आहेत. 

आकडेवारी, ग्राफिक्सचा वापर

काँग्रेस सरकारच्या काळामध्ये कच्च्या तेलाचे दर कसे होते, यामुळे पेट्रोल व डिझेलचे भाव कसे नियंत्रणात होते, याबद्दल पोस्ट फिरवत भाजप सरकारवर टीका केली जात आहे. तसेच प्रत्युत्तरादाखल भाजपसमर्थक नेटिझन्स काँग्रेसची सत्ता असतानाचे दर सांगून आताही काँग्रेसचीच सत्ता असली तर आणखीन वाढ झाली असती, असा दावा करत आहेत. दोन्ही बाजूंकडून वेगवेगळी आकडेवाडी व ग्राफिक्स सादर करून आपला दावा खरा असल्याचे ठासून सांगितले जात आहे. एकूणच सध्या उन्हाच्या गरमीबरोबर सोशल मीडियावरील वातावरणही पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे तप्त असल्याचे दिसून येत आहे.

चित्र व व्हिडिओंचा उपयोग

नेटिझन्स अफलातून कल्पना लढवून पेट्रोल दरवाढ समर्थन व विरोधासाठी परिणामकारक चित्र, व्हिडिओ व ग्राफिटी तयार करत आहेत. कल्पकतेने याचा उपयोग करून आपले म्हणने बिंबवले जात आहे. विशेष म्हणजे दोन्ही बाजूंकडून सादर करण्यात येणार्‍या अशा पोस्ट विचार करायला लावणार आहेत.

काही ठिकाणी झडताहेत वाद

काही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप व फेसबुक पेजवर चर्चेचे रूपांतर वादात होत आहे. काही नेटिझन्स एकमेकांना एकेरी शब्द वापरून दुखावत आहेत. सत्ताधारी व विरोधातील नेत्यांविषयी आक्षेपार्ह पोस्ट फिरवल्या जात आहेत. यामुळे ग्रुपमध्ये गरमागरमी सुरू असून यामुळे अन्य सदस्यांची मात्र गोची होत आहे.