Mon, Mar 18, 2019 19:16होमपेज › Jalna › रेशीम कोष खरेदीत कोट्यवधींची उलाढाल

रेशीम कोष खरेदीत कोट्यवधींची उलाढाल

Published On: Apr 30 2018 1:43AM | Last Updated: Apr 29 2018 11:44PMजालना : प्रतिनिधी

राज्यातील  रेशीम कोष खरेदीची पहिली बाजारपेठ 21 एप्रिल रोजी कार्यान्वित झाली. संपूर्ण मराठवाड्यातून कोष घेऊन शेतकरी येथे विक्री करीत आहेत. पहिल्याच दिवशी रेशीम कोष खरेदी-विक्रीत कोट्यवधींची उलाढाल झाली. प्रत्येक आठवड्यात गुरुवारी रेशीम खरेदी केली जाणार असून त्यासाठी मराठवाड्यातील शेतकरी रेशीम कोष येथे विक्रीसाठी आणत आहेत.

देशात कर्नाटकातील रामनगरम हे रेशीम खरेदीचे सवार्र्ंत मोठे केंद्र म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील शेतकरी रेशीम कोष विक्रीसाठी रामनगरमला जात होते. मात्र शेतकर्‍यांची रामनगरमला माल घेऊन जाण्याची अडचण लक्षात घेउन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या प्रांगणात रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू केल्याने आता रेशीम उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. 

जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा रेशीम शेतीकडे असलेला वाढता कल लक्षात घेऊन आमदार राजेश टोपे यांनी दिशा सिल्क या नावाने शहरालगत जवळपास 4 कोटी रुपये खर्च करून रेशीम कोषापासून धागा उत्पादन करणारा कारखाना सुरू केला. त्यामुळे भविष्यात कर्नाटकातून येणार्‍या व्यापार्‍यांवर शेतकर्‍यांना अवलंबून राहावे लागणार नाही. रेशीम कोष खरेदी करणारे 27 व्यापारी हे कर्नाटकातील रामनगरमल येथील आहेत. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीकडेही जवळपास 16 व्यापार्‍यांनी रेशीम कोष खरेदीसाठी अर्ज केले आहेत. रेशीम कोष परवाना मिळवण्यासाठी केवळ 200 रुपये फीस आकारली जात आहे. 

गुरुवार, 26 एप्रिल रोजी झालेल्या शुभारंभानंतरच्या पहिल्या लिलावात बीड, हिंगोली, जालना जिल्ह्यातील 17 शेतकर्‍यांनी 9 क्विंटल रेशीम कोष विक्रीसाठी आणला होता. त्यास 400 ते 270 रुपये प्रतिकिलोचा भाव मिळाला. विदर्भातील भंडारा येथील भंडारा सिल्कतर्फेही रेशीम कोष खरेदी केला जात आहे. येत्या काही दिवसांत या भागात रेशीम शेती मोठ्या प्रमाणावर केली जाणार आहे. रेशीम शेतीव्दारे शेतकर्‍यांच्या अर्थकारणात सकारात्मक बदल घडविण्यासाठी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार राजेश टोेपे हे प्रयत्न करीत आहेत.